Breaking News

मुक्या जनावरांसाठी माणगावातून हिरवा चारा

माणगाव : प्रतिनिधी

येथील शासकीय, निमशासकीय कर्मचारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी पूरग्रस्त भागातील मुक्या जनावरांसाठी हिरवा चारा आणि भुसा तसेच औषधे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात रवाना केली. राज्य सरकारी कर्मचारी संघटना, शासकीय, निमशासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती यांच्या माणगाव येथील प्रतिनिधींनी स्वातंत्र्य दिनी (दि. 15) ‘एक घास पूरग्रस्तांच्या मुक्या जनावरांसाठी‘ हे अभियान राबवून जमा केलेला हिरवा चारा, भुसा आणि औषधे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकार्‍यांमार्फत पूरग्रस्त कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात रवाना केली. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदीप नागे, माणगाव तालुकाध्यक्ष राजेंद्र खाडे, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. शाह व त्यांच्या सहकार्‍यांनी आरोग्य विभागाचे सेवक संजय राऊत, विलास पवार, सुधीर खैरे आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने ‘एक घास पूरग्रस्तांच्या मुक्या जनावरांसाठी‘ हे अभियान राबविले होते.

महाडमध्ये पूरग्रस्तांना नुकसानभरपाईचे वाटप

महाड : प्रतिनिधी

अतिवृष्टीने महाड तालुक्यात घरे आणि पाळीव जनावरांचे नुकसान झालेल्या आपद्ग्रस्तांना  नुकसानभरपाईचे वाटप सुरू करण्यात आले आहे. या वेळी घरांचे नुकसान झालेल्या 49 जणांना आर्थिक मदतीचे वाटप केले असल्याची माहिती तहसीलदार चंद्रसेन पवार यांनी दिली. महाड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने मोठे आर्थिक नुकसान झाले असून, यामध्ये भातशेती, घरे आणि पाळीव जनावरांचा समावेश आहे. पूर ओसरल्यानंतर याबाबत महसूल विभागाने तत्काळ पंचनामे केले असून, त्यानुसार तालुक्यातील 49 जणांना घरांचे नुकसान झाल्याबाबत दोन लाख 27 हजार 550 रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. नुकसानभरपाईची रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांची जनावरे या पुरात मरण पावली आहेत. त्यांना आतापर्यंत सहा लाख 22 हजार रुपयांची मदत वाटप झाली आहे. विन्हेरे गावातील मंगेश रामभाऊ विसापूरकर याचा खेड येथे बुडून मृत्यू झाला. या मयत व्यक्तीच्या नातेवाइकांना तत्काळ मदत म्हणून चार लाख रुपये देण्यात आले आहेत. सदर व्यक्ती महाड तालुक्यातील असून खेडमध्ये पुरात मयत झाल्याने ही मदत केली असल्याचे तहसीलदार पवार यांनी सांगितले. महाड तालुक्यातील शेतीचे पंचनामे अद्याप सुरू आहेत. हे पंचनामे कृषी विभाग, महसूल आणि पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू आहेत. याबाबतदेखील लवकरच मदत प्राप्त होईल, असेही तहसीलदार चंद्रसेन पवार यांनी सांगितले.

खोपोली : रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधितांच्या मदतीसाठी खालापूर तालुक्यातील श्री गणपती संस्थान, महड या संस्थेच्या वतीने एक लाख रुपयांचा धनादेश संस्थेच्या विश्वस्त मोहिनी वैद्य यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे शुक्रवारी (दि. 16) सुपूर्द केला.

कर्जतमधील रिक्षाचालक आणि ‘आरपीएफ’कडून मदतीचा हात

कर्जत : बातमीदार

पूरग्रस्तांना मदत करणार्‍यांत हातावर पोट भरणारी कुटुंबेदेखील मागे नाहीत. कर्जत रेल्वे स्थानकातून प्रवासी वाहतूक करणार्‍या रिक्षाचालकांनी एकत्र येत पूरग्रस्तांसाठी मदत गोळा केली आहे. त्यात रेल्वे स्थानकातील आरपीएफ जवानांनीदेखील भर टाकण्याचे काम केले आहे. सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना कर्जत रेल्वे स्थानक येथील तीन आसनी रिक्षाचालक- मालक संघटनेने 100 किलो धान्य गोळा केले. त्यात आरपीएफ कर्मचार्‍यांकडून 50 किलो तांदूळ देण्यात आले. हे सर्व धान्य रिक्षाचालकांनी कर्जत तहसील कार्यालयात नेऊन दिले आहे. रिक्षाचालकांच्या या मदतीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply