Breaking News

राज्यातील महापुरानंतर मदतीचा पूर

कर्जतच्या गणेशोत्सव मंडळांनी जपली सामाजिक बांधिलकी

कर्जत : बातमीदार

सांगली आणि कोल्हापूर परिसरात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे अनेक कुटुंबे अक्षरशः रस्त्यावर आली. पूरग्रस्तांसाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागातून मदतीचा ओघ सुरू आहे. अनेक संस्था, मंडळे, राजकीय पक्ष, व्हॉट्सअ‍ॅप समूह मदतकार्यासाठी सरसावले आहेत. कर्जत शहर आणि रायगड जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीदेखील या कार्यात पुढाकार घेतला आहे. सांगलीमध्ये जाऊन 200 कुटुंबांना मदत पोहचविण्याचे काम येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसोबत कर्जत दहिवली गुजराती समाज, ब्राह्मण समाज आणि असंख्य कर्जतकर बंधू-भगिनींचे हात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले. पूरग्रस्तांची गरज ओळखून घेऊन अन्नधान्य (तांदूळ, डाळ, गव्हाचे पीठ, तेल, इतर पदार्थ), कपडे (स्त्रियांसाठी साडी, अन्य कपडे, पुरुषांचे कपडे, टॉवेल रुमाल), दैनंदिन जगण्यासाठी लागणार्‍या (बादली, झाडू, कपड्याचा, अंगाचा साबण, डेटॉल, फिनेल, मेणबत्ती, काडेपेटी, डांबर गोळ्या, मच्छर अगरबत्ती, सॅनिटरी नॅपकिन्स, तेल, सुका खाऊ, ब्रश, टूथपेस्ट) आदी गोष्टींची 200 पाकिटे बनवून घेतली. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील अमणापूर गावातील प्रत्येक गरजू घरी ही मदत पोचवण्यात आली. या वेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

अनेकदा मदत गरजवंतांपर्यंत पोहचत नाही असे ऐकून होतो, म्हणून प्रत्यक्ष जाऊन पूरग्रस्त आणि गरजू घरापर्यंत मदत पोचविण्याचे कार्य मंडळातर्फे करण्यात आले, असे अध्यक्ष परेश पांडे यांनी सांगितले. कर्जत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष परेश पांडे यांच्यासह किशोर वैद्य, संदीप भोईर, विवेक भागवत, अभिजित मराठे, पंकज शहा, रोनक कोठारी, आशिष गोखले, देवेन बडेकर, समीर लाड, चेतन दळवी, प्रज्ञेश नर्लेकर, हृषीकेश दातार, जितू जोशी, कल्पेश शहा, मंगेश जोशी, निलेश परदेशी, कुणाल गुरव आदी सभासद आणि पदाधिकार्‍यांनी पूरग्रस्तांना मदत पोहचविली.

पेणमधून 350 पूरग्रस्त कुटुंबांना मदत

पेण : प्रतिनिधी

कोल्हापूरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पेणमधील नागरिकांनी मदतीचा हात दिला आहे. 350 पूरग्रस्त कुटुंबांना आठ दिवस पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तू घेऊन पेणमधील रामेश्वर ग्रुपचे अनेक कार्यकर्ते संचालक राजू पिचिका यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर, शिरोळ येथे नुकतेच रवाना झाले. या वस्तूंमध्ये तांदूळ, तूरडाळ, गोडेतेल, मसाला, मीठ, हळद, बिस्कीट पुडे, बिस्लरी पाणी बॉटल, कपडे व सॅनिटरी नॅपकिन यांचा समावेश आहे. या सर्व वस्तूंच्या बांधणीसाठी लाहिरी पिचिका, भाविका कोळी, आरूशी पांडे, करण लेहाल, नम्रता म्हात्रे, जान्हवी पाटील, हिमांशू म्हात्रे तसेच रामेश्वर ग्रुपचे प्रकाश झावरे, मनोज मोरे, संदेश शृंगारे, मनोहर पाटील, शांताराम मोकल, समृद्धी महिला बचतगट यांनी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply