कर्जत : बातमीदार
पारंपरिक सण अतिशय उत्साहात विविध संस्कारक्षम उपक्रमांनी साजरे केले जाणे हे कर्जत तालुक्यातील हेदवली शाळेचे वैशिष्ट्य आहे. शनिवारी गोपाळकालाही शाळेत असाच उत्साहात साजरा झाला. शाळेतील दहीहंडीला स्नेहहंडी असे अर्थपूर्ण नाव देण्यात आले. विद्यार्थ्यांत परस्पर स्नेहाचे वातावरण वृद्धिंगत व्हावे या दृष्टीने एक वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा घेण्यात आली. शालेय परिसरात क्रमवार लपवलेली सांकेतिक भाषेतील कोडी व उखाणे परस्पर सहकार्याने सोडवत त्यांना हंडीपर्यंत पोहचायचे होते. ही गमतीदार कोडी क्रमाने जो गट सर्वप्रथम सोडवत पुढे पुढे जाईल त्यालाच हंडी फोडता येईल. अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली. या वेळी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्याधापक महादू दरवडा, बाळा गायकर, शांताराम पवार, सरिता पाटील आदी उपस्थित होते. थर लावताना जखमी होण्याचे प्रकार टाळत विद्यार्थ्यांमध्ये स्नेहभाव जागृत करत हा कार्यक्रम साजरा झाला. विजेत्या गटाने हंडी फोडल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी दहीकाल्याचा प्रसाद खाल्ला. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना लायन्स क्लब अंबरनाथतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, तसेच वृक्षारोपण करण्यात आले.