
अलिबाग : प्रतिनिधी
इंटीग्रेटेड इंडस्ट्रियल टाऊनशिपसाठी प्रस्तावित असणार्या दिव (ता. रोहा) गावातील गट नं. 133 या सरकारी खाजण जमिनीला खोत दाखवून त्या जमिनी कुळांच्या नावे करून दलाल आणि गुंतवणूकदारांच्या घशात घालण्याचा प्रयत्न काही महसूल अधिकार्यांनी केला. या जमिनी हडप करण्याच्या कटात सामील असलेल्या दलाल व शासकीय अधिकार्यांवर कारवाई करा, अशी मागणी सर्वहारा जनआंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांनी रायगडचे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. अलिबाग येथे शुक्रवारी (दि. 23) घेतलेल्या पत्रकार परिषदेत उल्का महाजन यांनी याबाबतची माहिती दिली. या वेळी त्यांच्या सोबत काही शेतकरी महिलाही उपस्थित होत्या. दिव येथील जमिनीबाबत कुळकायद्याच्या माध्यमातून महसूल अधिकार्यांनी त्वरित अंमलबजावणी केली. अशी अंमलबजावणी देशात कुठेही झाली नाही. एका महिन्यात संबंधित जमीन खोती दाखवून त्याचे कुळांना तत्परतेने वाटप करून त्याच जमिनींची पुन्हा विक्री करण्यात आली. त्यात कोणत्याही शर्ती, अटी दिल्या गेल्या नाहीत. या संपूर्ण व्यवहारात तत्कालीन तहसीलदार, नायब तहसीलदार, रजिस्टार हे जबाबदार असल्याचा आरोप उल्का महाजन यांनी केला आहे. जमिनीचा दस्त करताना त्यात जमिनीच्या क्षेत्राचा तपशील दिला गेला नाही. तरी बिनबोभाट दस्त तयार झाला. त्यानंतर ताबडतोब दुसरे खरेदीदार आणि गुंतवणूकदार उभे राहिले आणि त्यांना हातोहात जमीन विकली गेली. त्यामध्ये दोन्ही बाजूचे अखत्यारपत्र घेणारी व्यक्ती एकच असल्याचे निदर्शनास येते. हा सारा प्रकार केवळ संशयास्पदच असून, त्यात नियोजनपूर्वक भ्रष्टाचार असल्याचा आरोपही उल्का महाजन यांनी केला.
सर्वहारा जनआंदोलनाच्या माध्यमातून या विषयाला वाचा फोडल्यानंतर या खरेदी विक्री व्यवहारांना स्थगिती देण्यात आली आहे, मात्र जमीन खरेदी विक्री करणारे महसूल अधिकारी, निबंधक कार्यालयातील अधिकारी, दलाल आणि गुंतवणूक दार मोकाट आहेत. त्यांनी नियमांना बगल देत जागेच्या नोंदीत फेरफार केले आहेत. निबंधक कार्यालयाने जागेची पडताळणी न करताच खरेदी विक्री व्यवहारांची नोंद केली आहे. त्यामुळे या प्रकरणात गुन्हे दाखल करून, तसेच उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई व्हायला हवी.
-उल्का महाजन, नेत्या, सर्वहारा जनआंदोलन