मुंबई ः प्रतिनिधी
अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूला येत्या 24 फेब्रुवारीला एक वर्ष पूर्ण होत असून यानिमित्ताने कपूर कुटुंबीयांनी श्रीदेवींच्या साडीचा ऑनलाईन लिलाव ठेवला आहे. हा लिलाव सुरू झाला असून आतापर्यंत या साडीला सव्वा लाखांपर्यंतची बोली लागली आहे. श्रीदेवी यांच्या अकाली मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला होता. त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने 14 फेब्रुवारी रोजी कपूर कुटुंबीयांनी चेन्नईत खास पूजा ठेवली होती. त्यानंतर आता श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांनी श्रीदेवींच्या कोटा साडीचा लिलाव ठेवला आहे. 40 हजार रुपयांपासून बोलीला सुरुवात झाली असून ती आता एक लाख 25 हजारांपर्यंत पोहचली आहे. लिलावातून मिळणारी रक्कम निराधार महिला, अनाथ मुले आणि वृद्धांसाठी काम करणार्या ‘कन्सर्न इंडिया फाऊंडेशन प्रोग्राम’ या संस्थेला दिली जाणार आहे. श्रीदेवी बॉलीवूडमधील फॅशन आयकॉन म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांना डिझायनर कपड्यांची आवड होती. साऊथ इंडियन प्रकारातील कोटा साडी ही श्रीदेवी यांची ओळख होती.