मुंबई : प्रतिनिधी
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडी)च्या 147व्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी रुपये 16 हजार 909.10 कोटींचा अर्थसंकल्प 2019-20 साठी मंजूर केला. या अर्थसंकल्पामध्ये विरार-अलिबाग बहुद्देशीय मार्गासाठी दोन हजार 250 कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे.
या अर्थसंकल्पामध्ये विविध प्रकल्पांसाठी महत्त्वपूर्ण अशी तरतूद करण्यात आली आहे. यात महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी तरतूद करण्याप्रमाणेच लोकप्रिय नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकांसाठीही तरतूद करण्यात आली आहे. दादर येथील इंदू मिल कम्पाऊंडमध्ये उभारण्यात येणार्या डॉ. आंबेडकरांच्या व दादर येथीलच महापौर बंगल्याच्या जागी उभारण्यात येणार्या ठाकरे यांच्या स्मारकासाठी अर्थसंकल्पामध्ये 210 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही दोन्ही स्मारके आजच्या व येणार्या पिढ्यांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील.
आमचा उद्देश स्पष्ट आहे आणि दृष्टिकोन सकारात्मक आहे. उज्ज्वल भविष्यासाठी जर मेट्रो अनिर्वाय असेल, तर त्याचप्रमाणे थोर नेत्यांची मार्गदर्शक तत्त्वे ध्यानात ठेवणेही आमच्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. एकीकडे पायाभूत सुविधा ही काळाची गरज असतानाच स्मारके आपल्याला आपल्या इतिहासाशी आणि जमिनीशी जोडून ठेवण्याचे काम करतात हे विसरून चालणार नाही. भूत, वर्तमान, भविष्य आणि पर्यावरण या चार गोष्टीच आपल्याला संपूर्ण विकासाकडे घेऊन जाऊ शकतात, असे श्री. फडणवीस शेवटी म्हणाले.
अर्थसंकल्पामध्ये आरे येथे उभारण्यात येणार्या मेट्रो भवनासाठी रुपये 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या भवनात प्रशिक्षण केंद्र, मेट्रो संचलन व नियंत्रण केंद्र, कार्यालये, कॅफेटेरियाप्रमाणेच सात रहिवासी मजले असणार आहेत. मुंबई आणि महानगर प्रदेशातील 13 मेट्रो मार्गाचे संचलन व नियंत्रण या मेट्रो भवनातून होणार आहे. अर्थसंकल्पामध्ये मुंबई पारबंदर प्रकल्प आणि विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्ग या दोन मोठ्या प्रकल्पांसाठी भरघोस अशी तरतूद करण्यात आली आहे. पारबंदर प्रकल्पासाठी तीन हजार कोटी; तर बहुद्देशीय मार्गासाठी रुपये दोन हजार 250 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. हे दोन प्रकल्प पर्यावणास पूरक असून इंधन व वेळेची बचत करणारे ठरणार आहेत. सूर्या प्रादेशिक जलपुरवठा योजनेसाठी अर्थसंकल्पामध्ये तब्बल 704.20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत 88 किमी लांबीच्या पाईप लाईनद्वारे मिरा-भाईंदर आणि वसई-विरार महापालिका क्षेत्रामध्ये 403 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यापैकी 185 दशलक्ष लिटर पाणी वसई-विरार, तर 218 दशलक्ष लिटर पाणी मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रांना दररोज पुरवण्यात येणार आहे. सूर्या जलपुरवठा योजना अतिशय आगळीवेगळी अशी आहे. इच्छित ठिकाणी पाणीपुरवठा करण्यासाठी योजनेमध्ये वीज किंवा त्या अनुषंगाने खर्च न करता गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करण्यात येणार आहे. आणखीही काही महत्त्वपूर्ण प्रकल्पांना अर्थसंकल्पामध्ये प्राधिकरणाने प्राधान्य दिले आहे. 18.28 किमी लांबीचा मोनोरेलचा वडाळा ते संत गाडगे महाराज चौकपर्यंतचा दुसरा टप्पा प्राधिकरणातर्फे लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी प्राधिकरणाने 150 कोटींची तरतूद केली आहे. मोनोरेलशिवाय इतर काही प्रकल्पांसाठी करण्यात आलेली तरतूद विस्तारीत मुंबई पायाभूत सुविधा प्रकल्प (800 कोटी, भूसंपादनासह); मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (500.10 कोटी); मुंबई महानगर प्रदेशाच्या बाह्य क्षेत्रातील रस्ते सुधारणा (143 कोटी); सांताक्रूझ-चेंबूर जोड रस्त्याचे कुर्ला ते वाकोला पुलापर्यंत विस्तारीकरण, तसेच वांद्रे-कुर्ला संकुल ते पश्चिम दृतगती महामार्गापर्यंत उन्नत मार्ग बांधणे (100 कोटी), पूर्व दृतगती महामार्गावरील छेडानगर जंक्शन, घाटकोपर (पूर्व) येथे उन्नत मार्ग सुधारणा करणे (75 कोटी); तसेच कलिना येथील मुंबई विद्यापीठ परिसरात पायाभूत सुविधा पुरविणे (54 कोटी) अशी आहे.
प्राधिकरणाच्या बैठकीनंतर महानगर आयुक्त आर. ए. राजीव विशेष समाधानी दिसले. ते म्हणाले, केवळ मुंबई नव्हे तर एकूण महानगर परिसराची काळजी प्राधिकरणाच्या निर्णय प्रक्रियेत दिसून आली. मेट्रो, मेट्रो भवन, रस्ते विकास, जलपुरवठा, स्मारके अशा विविधांगी प्रकल्पांकडे विशेषत्वाने लक्ष देण्यात आले. या वेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता, नगर विकास प्रधान सचिव नितीन करीर, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर, सिडकोचे व्यवस्थापकिय संचालक लोकेश चंद्रा, उल्हानगर महापालिकेच्या महापौर पंचम कलानी, मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौर डिंपल मेहता, ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा जाधव, मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, नगरसेवक रवी राजा, मनोज कोटक, पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील, उरणच्या नगराध्यक्षा रूपाली म्हात्रे आदी उपस्थित होते.
-मेट्रो प्रकल्पांसाठी भरीव निधी
10 मेट्रो प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पामध्ये 7 हजार 486.50 इतकी तरतूद आहे. यामध्ये मेट्रो भवनासाठीची 100 कोटीची तरतूदही आहे. विविध मेट्रो प्रकल्पांसाठी करण्यात आलेली तरतूद वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो-1 (98 कोटी); दहिसर ते डी. एन. नगर मेट्रो-2अ (1 हजार 895 कोटी); डी. एन. नगर ते मंडाले मेट्रो-2ब (519.60 कोटी); कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-3 (650 कोटी); वडाळा ते कासारवडवली मेट्रो-4 (1 हजार 337 कोटी); ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-5 (150 कोटी); समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो-6 (800 कोटी); अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) मेट्रो-7 (रु. 1 हजार 921 कोटी); गायमुख ते शिवाजी चौक मेट्रो-10 (रु. 5 कोटी); वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो-11 (5 कोटी) आणि कल्याण ते तळोजा मेट्रो-12 (5 कोटी) अशी आहे.