विकास संघर्ष समितीचे आगार प्रमुखांना निवेदन
कर्जत : बातमीदार
खालापूर तालुक्यातील रसायनी येथील पिल्लई महाविद्यालयात कर्जत येथून जाणार्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. या विद्यार्थ्यांसाठी रोज सकाळी आणि संध्याकाळी बस गाड्या सोडण्यात याव्यात, अशी मागणी कर्जत विकास संघर्ष समितीने येथील एसटी आगार प्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीला कर्जत आगारानेही साकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कर्जत येथून एसटीने रसायनी येथे जाणार्या विद्यार्थ्यांची संख्या दोनशेच्या आसपास आहे. कोरोनापूर्वी कर्जत एसटी आगारातून रसायनीसाठी सकाळी आणि संध्याकाळी दोन एसटी गाड्या सोडल्या जात होत्या, मात्र त्या गाड्या लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा सुरु करण्यात आल्या नाहीत. सध्या कर्जत येथून रसायनी मार्गे पेण आणि अलिबागकडे जाणार्या एसटी गाड्यांची संख्या मर्यादित असल्याने विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयात पोहचण्यासाठी सकाळच्या वेळी मोठी कसरत करावी लागते. एसटीचा पास विद्यार्थ्यांना परवडत असतो, मात्र एसटी गाड्या नसल्याने विद्यार्थ्यांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. अनेक विद्यार्थ्यांना अधिकचा खर्च करून खासगी वाहनातून महाविद्यालयात जावे लागते. त्यात अनेकदा महाविद्यालयांत पोचायला उशीर होतोे. कर्जत येथून रसायनी येथे जाणार्या विद्यार्थ्यांसाठी एसटी आगाराने सकाळच्या वेळी दोन आणि सायंकाळच्या वेळी दोन कायमस्वरूपी बस सोडाव्यात, या मागणीचे निवेदन कर्जत विकास संघर्ष समितीने आगार प्रमुख शंकर यादव यांना दिले. या वेळी संघर्ष समितीचे कृष्णा जाधव, सतीश पिंपरे यांच्यासह पालक उपस्थित होेते.