Breaking News

इजा, बिजा आणि तिजा! काँग्रेस पक्षानेही केले शतकमहोत्सवी खताळ-पाटलांकडे दुर्लक्ष!

4 ऑगस्ट रोजी आपण महाराष्ट्राच्या राजकारणात उत्कृष्ट संसदपटू म्हणून कार्य करणार्‍या आणि आयुष्याचे शतक फटकावणार्‍या नेत्यांबद्दल चर्चा केली. त्या चर्चेत एक महत्त्वाचे नाव आमचे स्नेही समीर मणियार आणि बा. बा. वाघमारे यांच्याकडून पुढे आले ते होते भिकाजी जिजाबा खताळ-पाटील यांचे. समाजवादी चळवळीत वाहून घेतलेल्या दत्तात्रय बाळकृष्ण ताम्हाणे उर्फ दत्ता ताम्हाणे यांनी 2014 साली वयाची 100 वर्षे पूर्ण केली, तर ज्या शेतकरी कामगार पक्षाचा खटारा संपूर्ण महाराष्ट्रात नेला ते नांदेड जिल्ह्यातील कंधारचे झुंझार नेते केशवराव धोंडगे यांनी 17 जुलै 2019 रोजी आपल्या आयुष्याचे शतक फटकावले. त्या दोन्ही हयात शतकवीरांकडे समाजवाद्यांनी आणि शेतकरी कामगार पक्षाने अक्षम्य दुर्लक्ष केले. हे दोन्ही धुरंधर नेते विरोधी पक्षात असताना त्यांनी संसदीय कारकीर्द गाजवली.

विधानसभा आणि विधान परिषदेत आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटविला. या नेत्यांनी वयाची 100 वर्षे पूर्ण करूनही त्यांची योग्य ती दखल घेतली गेली नाही. महाराष्ट्र किंबहुना देश पातळीवरील महत्त्वाचे असे मुद्दे या नेत्यांनी पुढे आणून राज्याच्या विकासाला दिशा दिली आहे. आज आपण दिवंगत शतकवीरांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करून त्या त्या दिवंगत नेत्यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करतोय. ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे, पण ज्यांनी आपल्या आयुष्याचे शतक फटकावले अशा हयात शतकवीरांसाठी आपण काही केले तर त्या हयात संसदपटू नेत्याला आपण काहीतरी चांगले केले आणि त्याची समाजाने दखल घेतली हे पाहून ’याचि देही याचि डोळा’ जन्माचे सार्थक झाले असे निश्चितच वाटल्याशिवाय राहणार नाही. याच श्रृंखलेतील दिग्गज नेते भिकाजी जिजाबा खताळ-पाटील यांचे नुकतेच बरोबर शंभराव्या वर्षी देहावसान झाले. भिकाजी जिजाबा खताळ-पाटील हे  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते.

इतकेच नव्हे तर संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर यशवंतराव चव्हाण, मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण आणि बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले या पाच मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात सहकार, नियोजन, महसूल, विधी व न्याय, अन्न व नागरी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे या महत्त्वपूर्ण खात्यांची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. 26 मार्च 1919 रोजी संगमनेर येथे जन्मलेल्या भिकाजी जिजाबा खताळ- पाटील यांनी पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातून तसेच विधी महाविद्यालयात शिक्षण घेतले.

1952 साली संगमनेर मतदारसंघातून विधानसभेची पहिल्यांदा निवडणूक लढविली, पण त्यांना दत्ता देशमुख यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामुळे 1957ची निवडणूक त्यांनी लढविली नाही. कारण ते संयुक्त महाराष्ट्राचे कट्टर समर्थक होते. त्यांनी पक्षाच्या नेतृत्वाला तसे परखडपणे सांगितले होते.  त्यानंतर 1962-1967,  1967-1972, 1972-1978 आणि 1980-1985 या काळात त्यांनी संगमनेर मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी होत महात्मा गांधी यांच्या चले जाव चळवळीत भाग घेतला होता. राजकारणात काम करीत असताना त्यांनी साहित्य क्षेत्रातही आपला ठसा उमटविला.  ’गुलामगिरी’, ’धिंड लोकशाहीची’, ’गांधीजी असते तर’, ’अंतरीचे धावे’ आणि ’लष्करी विळख्यातील पाकिस्तान’ ही पाच पुस्तके भिकाजी जिजाबा खताळ- पाटील यांनी लिहिली. 61व्या वर्षी 1980 साली शेवटची निवडणूक लढविली आणि ती जिंकणार्‍या तसेच 1985 साली राजकारणातून निवृत्ती घेतलेल्या भिकाजी जिजाबा खताळ-पाटील यांनी वयाच्या शंभराव्या वर्षी लिहिलेल्या ’माझे शिक्षक’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला.

सोमवार 16 सप्टेंबर 2019 रोजी वयाच्या शंभराव्या वर्षी भिकाजी जिजाबा खताळ-पाटील यांनी प्रवरा नदीतीरावरील अमरधाममध्ये आपला देह ठेवला. खरं सांगायचे म्हणजे ज्या संगमनेर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भिकाजी जिजाबा खताळ-पाटील यांनी केले, त्याच संगमनेर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे बाळासाहेब थोरात आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. बाळासाहेब थोरात यांचे पिताश्रीही ज्येष्ठ नेते व संसदपटू होते. बाळासाहेब थोरात हे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असूनही किंबहुना

त्यापूर्वीसुद्धा ते महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असतानाही भिकाजी जिजाबा खताळ-पाटील यांच्याकडे बाळासाहेब थोरात व पर्यायाने प्रदेश काँग्रेसने दुर्लक्ष करावे यासारखा कृतघ्नपणा दुसरा काय असू शकतो? समाजवाद्यांनी दत्ता ताम्हाणे यांच्याकडे, शेकापने केशवराव धोंडगे यांच्याकडे आणि आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाने भिकाजी जिजाबा खताळ-पाटील अशा ज्येष्ठ नेत्यांकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्राच्या राजकारणात इजा, बिजा, तिजा असा प्रकार घडला. हे महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्याला निश्चितच भूषणावह नाही.

निदान महाराष्ट्र विधिमंडळाने हयात, जिवंत शतकवीर संसदपटूंकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन राज्यातील 12 कोटी नागरिकांसमोर त्यांची थोरवी दाखवून द्यावी. शेकापने ज्यांच्याकडे दुर्लक्ष केले अशा केशवराव धोंडगे यांचा महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवतीर्थावर जाहीर शतकमहोत्सवी सोहळा साजरा करावा व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करावेत, एवढीच अपेक्षा. लई मागनं न्हाई!

-योगेश त्रिवेदी, मंत्रालय प्रहर

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply