लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्याने नागरिकांची गर्दी
पनवेल : वार्ताहर – लॉकडाऊनमुळे सुमारे पावणे दोन महिने बंद असलेली दुकाने पुन्हा सुरु झाल्याने सोमवारी पनवेलची बाजारपेठ पुन्हा गजबजलेली पहावयास मिळाली. काही दिवसांपूर्वी पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून घालण्यात आलेल्या अटी व नियमानुसार सुरू झाली आहेत. या संदर्भात प्रशासनाकडून नागरिकांना तसेच व्यापार्यांना नियम पाळण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे बाजारपेठेत व्यापारी व नागरिक नियमांचे पालन करुन तर काही ठिकाणी गर्दी असे चित्र दिसून येत आहे.
बाजारपेठेत एकाच वेळी सर्व दुकाने उघडल्यास खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होवू शकते. त्या अनुषंगाने सम-विषम प्रमाणात दिवसाआड दुकाने सुरू करण्यात आली आहेत. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळावे, मास्क प्रत्येकाने घालावा, सॅनिटायझरचा वापर करावा, दुकानात गर्दी करू नये अशासह अनेक सूचना आयुक्तांनी व्यापारी वर्गांसह नागरिकांना केल्या आहेत. या सुचनांचे पालन पनवेल बाजारपेठेतील काही दुकानांमध्येच होताना दिसत आहे.
सध्या अत्यावश्यक सेवेबरोबरच मोबाइल दुरुस्ती दुकाने, रेडीमेड कपड्याची दुकाने, संगणक, लॅपटॉप दुरुस्ती, हार्डवेअर, बांधकाम साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, शालेय पुस्तकांची दुकाने, सोन्या-चांदीच्या व्यापार्यांची दुकाने सुरू झाली असून पनवेल तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यास बाजारपेठेत येत असल्याने वाहनांची वर्दळ बाजारपेठेत चांगली दिसून येत आहे. असे असले तरी खरेदी करण्यासाठी जाणारे ग्राहक हे शासनाने आखून दिलेल्यार नियमांचे पालन करीत आहेत तर काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन करुन गर्दी करीत आहेत. त्यामुळे लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत तसेच नागरिकांनी त्या नियमाचे पालन देखील शिथिल केलेले पहावयास मिळत आहे.
पावसाळी वस्तू खरेदीसाठी झुंबड
उरण : प्रतिनिधी – उरण शहरात पावसाळ्यातील वापरात येत असलेल्या वस्तूंच्या खरेदीसाठी उरण शहरासह तालुक्यातील काही नागरिक बाजारपेठेत दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. त्याच लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्याने सुरक्षित अंतर राखण्याचे भान विसरून नागरिक बाजारपेठेत खरेदीसाठी झुंबड करीत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उरण येथील बोकडविरा केअर पॉईंट हॉस्पिटलमध्ये कोरोना चाचणीही सुरू करण्यात आली असून, मागील चार दिवसांपूर्वी जेएनपीटी प्रशासनाने केअर पॉईंट हॉस्पिटल समोर असलेल्या कौशल्य विकास केंद्राच्या इमारतीमध्ये कोविडसाठी रुग्णवाहिकेसह 120 बेडच्या रुग्णालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र येथील नागरिकांनी कोरोनाशी लढून जीवन जगायला शिकले पाहिजे, कोरोनाचे भान विसरून चालणार नाही. त्यामुळे पुन्हा कोरोनाची लाट पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या व्हायरसची लस अद्याप उपलब्ध नसल्याने आणखी काही महिने सतर्क राहूनच दैनंदिन कामांची रेलचेल नागरिकांनी करणे गरजेचे असतांना, मात्र कोणत्याही कामासाठी येथील काही नागरिक शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असून सुरक्षित अंतर ठेवणे या शिवाय सध्या या संसर्गावर उपाय नसल्याने ’गर्दी टाळू या, कोरोनाशी लढू या’ या शिवाय पर्याय नाही, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती
उरणमध्ये कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या व्हायरसचा प्रभाव कमी होण्याची दिशेकडे वाटचाल करीत असताना शहरातील बाजरपेठेत काही नागरिक गर्दी करीत असलेले पहावयास मिळत आहे. त्याचा परिणाम उलटा होऊन कोरोनाचा एखादा पॉझिटिव्ह रुग्णामुळे पुन्हा एकदा उरणमध्ये संपूर्ण बाजरपेठ बाधित होण्याची भिती वर्तविण्यात येत आहे.