विकास आराखडा, नगर रचनेला शासनाची मंजुरी
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा
सिडकोच्या नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्र अर्थात नैना प्रकल्पातील अंतरिम विकास आराखड्यातील 23 गावे वगळून उर्वरित गावांच्या विकास आराखड्यास आणि प्रारंभिक नगर रचना क्र. 1ला राज्य शासनातर्फे सप्टेंबर 2019मध्ये मंजुरी देण्यात आल्याने नैना प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे.
आता 23 गावांसह नैनाच्या संपूर्ण क्षेत्राची विकास योजना मंजूर झालेली आहे. 23 गावांतील 37 चौ.किमी क्षेत्राकरिता अंतरिम विकास योजना शासनातर्फे 27 एप्रिल 2017 रोजी मंजूर झाल्यानंतर नगर रचना परियोजनांच्या माध्यमातून पायाभूत सुविधांसह नैना प्रकल्प क्षेत्राचा विकास करण्याचा निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आला आहे.
सिडकोतर्फे 19.11 हेक्टर क्षेत्रासाठी 11 ऑगस्ट 2017 रोजी प्रथम नगर रचना परियोजना प्रस्तावित करण्यात आली. या प्रारूप योजनेस 22 सप्टेंबर 2018 रोजी मंजुरी मिळाली ज्यामुळे रस्त्याखालील जमिनी पायाभूत सुविधांच्या विकासाकरिता प्राधिकरणास प्राप्त झाल्या. नगर रचना परियोजना क्र. 1 मध्ये रस्ता बांधणीची कंत्राटे देण्यात आलेली आहेत. आता प्रारंभिक नगर रचना क्र. 1ला शासनाची मंजुरी मिळाल्याने सिडकोला जमीनमालकांना अंतिम भूखंड सोपविणे शक्य होणार आहे; तर सार्वजनिक सोयीसुविधा, मोकळ्या जागा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी घरे, विकास केंद्र इ. जमिनी ज्या कारणासाठी राखीव ठेवल्या आहेत त्या प्रयोजनासाठी विकसित होणे शक्य झाले आहे. महाराष्ट्रात साधारणतः तीन दशकांच्या कालावधीनंतर जमीन एकत्रीकरण व पुनर्रचनेची एकमेवाद्वितीय योजना घोषित करून तिला विक्रमी कालावधीत तडीस नेणारे सिडको अग्रगण्य प्राधिकरण ठरले आहे.
23 गावांच्या विकसनशील क्षेत्राच्या 70% भागावर म्हणजेच सुमारे 1700 हेक्टरवर घोषित करण्यात आलेल्या सहा योजनांवर सिडकोने काम सुरू केलेले आहे. अंतरिम विकास योजनेची अंमलबजावणी 11 नगर रचना योजनांच्या माध्यमातून करून या परिसरात पायाभूत व सामाजिक सेवा सुविधा पुरविण्याचा सिडकोचा मानस आहे. डिसेंबर 2019 अखेरीस उर्वरित चार योजना घोषित करण्यात येणार आहेत. जमीन एकत्रीकरण व पुनर्रचनेच्या माध्यमातून मंजूर विकास योजनेची अंमलबजावणी करणे व त्यातून सुनियोजित विकास घडवून आणणे ही बाब सर्व जमीनधारकांसाठी जमेची बाजू राहणार आहे.
194 हेक्टरच्या प्रारूप नगर रचना परियोजना क्र. 2ला मंजुरी मिळाली असून, त्यासंबंधीची लवादीय प्रक्रिया सुरू आहे. 434 हेक्टर क्षेत्राकरिता प्रस्तावित असलेल्या रचना परियोजना क्र. 3च्या प्रारूप मसुद्यास नोव्हेंबर 2019पर्यंत मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. साधारणतः 1050 हेक्टरच्या नगर रचना परियोजना क्र. 4,5,6, व 7 सिडकोतर्फे घोषित करण्यात आलेल्या असून त्यांची सुनियोजित विकासाकडे वाटचाल सुरू झालेली आहे.
नैना प्रकल्पामध्ये सहभागी होणार्या जमीन मालकांना तांत्रिक बारकाव्यांसह प्रकल्पाची सविस्तर माहिती व्हावी याकरिता सिडकोतर्फे ‘वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) स्वरूपातील इंग्रजी व मराठीतील पुस्तिका सिडकोच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे.
सिडकोतर्फे उर्वरित 201 गावांचा विकास आराखडा नोव्हेंबर 2016मध्ये प्रकाशित करण्यात आला होता. या विकास आराखड्याची तत्त्वे सर्वसाधारणपणे 23 गावांच्या मंजूर अंतरिम विकास आराखड्यावर आधारित आहेत. यामध्ये मार्यादित विकास क्षेत्रात संकल्पनात्मक विकासाकरिता, तसेच मुख्य रस्त्याच्या बाजूस जमीन एकत्रीकरणाच्या योजनांमध्ये संक्रमण सापेक्ष विकासासाठी (ToD) वाढीव चटई क्षेत्र निर्देशांकाची तरतूद करण्यात आलेली आहे. सदर विकास आराखड्यामध्ये प्रादेशिक योजनेच्या तरतुदींनुसार औद्योगिक क्षेत्रेही प्रस्तावित आहेत. यामुळे नैना क्षेत्राच्या आर्थिक विकासास चालना मिळणार आहे. टप्पा 1 क्षेत्रातील उर्वरित भागाचा विकास सिडकोतर्फे येत्या पाच ते 10 वर्षांच्या कालावधीत करण्यात येणार आहे.
विकास योजनेस मंजुरी देताना नैनातील काही असंलग्न गावांचा विचार करता शासनाने नियोजनाच्या दृष्टीने असे असंलग्न भाग लगतच्या नियोजन प्राधिकरणामध्ये समाविष्ट केले व नैनाची विकास योजना 152 गावांसाठी मंजूर केली, तसेच 23 गावांची अंतरिम विकास योजना या आधीच मंजूर झालेली आहे.
संपूर्ण नैना क्षेत्राच्या विकास योजनेस मंजुरी मिळालेली असल्याने सिडको आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आजूबाजूचा परिसर विकसित व वृद्धिंगत करण्यासाठी त्यांचे स्रोत वापरणार आहे. नैना प्रकल्पाच्या एकंदर वेगवान अंमलबजावणीच्या दृष्टीने हे महत्त्वाचे ठरणार आहे.