
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारताच्या संभाव्य विकासवाढीची दखल घेत जगातील सर्वांत मोठा तेल निर्यातदार देश असलेल्या सौदी अरेबियानं गुंतवणुकीसाठी आता भारतावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. देशातील पायाभूत सुविधा आणि खाण आणि पेट्रोकेमिकल्स या क्षेत्रांमध्ये शंभर अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. सौदीचे ब्रँड अॅम्बेसेडर डॉ. सऊद बिन मोहम्मद अल सती यांनी ही माहिती दिली. सऊद बिन मोहम्मद अल सती म्हणाले, तेल, गॅस, खाण क्षेत्रांत सौदी अरेबियासाठी भारत हे आकर्षक गुंतवणुकीचे ठिकाण आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने सौदी भारताकडे पाहत आहे. ऊर्जा, तेल शुद्धीकरण, पेट्रोकेमिकल्स, इन्फ्रास्ट्रक्चर, कृषी, खनिजे आणि खाण क्षेत्रात सौदी अरेबिया शंभर अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याच्या विचारात आहे, असे डॉ. सऊद बिन मोहम्मद अल सती यांनी सांगितले. सौदी अरेबियाची सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडबरोबर प्रस्तावित भागीदारी दोन्ही देशांमधील वाढत्या ऊर्जा संबंधांचे धोरणात्मक स्वरूप प्रतिबिंबीत करते. भारतातील तेलपुरवठा, वितरण, पेट्रोकेमिकल्स आणि ऑईल शृंखलांमध्ये गुंतवणूक करणे हा अरामकोच्या जागतिक नीतीचा एक महत्त्वाचा भाग आहे.