ग्रामपंचायत निवडणूक निकाल; तालुक्यात 26 जागांवर भाजपचे उमेदवार; आमदार महेश बालदींकडून अभिनंदन

उरण : वार्ताहर
उरण तालुक्यातील नागाव, केगाव, म्हातवली, चाणजे, फुंडे व वेश्वी या सहा ग्रामपंचायत निवडणूक मतदान मतमोजणी सोमवारी (दि. 18) उरण नगरपरिषदेच्या महाराष्ट्रभूषण डॉ. नारायण विष्णू धर्माधिकारी शाळेत करण्यात आली. या वेळी वेश्वी ग्रामपंचायतीवर सर्वच्या सर्व जागांवर भाजपचे उमेदवार निवडुन आले आहेत. तालुक्यात भाजपचे 29 उमेदवार निवडून आले आहेत. या विजयी उमेदवारांचे आमदार महेश बालदी यांनी अभिनंदन केले आहे.
उरण तालुका निवडणुकीत भाजपच्या विजयी उमेदवारांचे भाजप कार्यालयात अभिनंदन करण्यात आले. एकमेकांना पेढे भरवत, पुष्पगुच्छ देत, हार घालून उमेदवारांचे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले. तालुक्यातील भाजपच्या 26 जागांमध्ये वेश्वी ग्रामपंचायतीत, फुंडे ग्रामपंचायतीमध्ये दोन, केगाव ग्रामपंचायतीत एक, नागाव ग्रामपंचायतीत तीन, चाणजे ग्रामपंचायतीत आठ तर म्हातवली ग्रामपंचायतीत पाच जागांवर उमेदवार निवडुन आले आहेत.
विजयी उमेदवारांमध्ये केगावमध्ये अविनाश कमलाकर पाटील; म्हातवलीमध्ये कस्तुरी बाळासाहेब भोजने, अश्विनी मिलिंद ससाणे, राकेश कमलाकर म्हात्रे, पल्लवी पराग म्हात्रे, रिना राजेश शिरधनकर; नागावमध्ये भूपेंद्र घरत, अमृता दैवत घरत, विनया विनोद ठाकूर; चाणजेमध्ये पुष्पा म्हात्रे, रवींद्र कोळी, सागर वाघमारे, अशोक कोळी, सोनाली ठाकूर, प्रमिला म्हात्रे, जागृती कोळी; फुंडे येथे जयवंती परशुराम म्हात्रे, कैलास मधुकर म्हात्रे; वेश्वीमध्ये अजित वसंत पाटील, सुनील विजयकांत तांबोळी, सोनाली विलास पाटील, संदीप जयवंत पाटील, नूतन प्रीतम मुंबईकर, प्रमिला महेंद्र मुंबईकर आदी उमेदवार निवडून आले आहे. या सर्व उमेदवारांचे आमदार महेश बालदी यांनी अभिनंदन केले.