माणगाव : प्रतिनिधी
सुप्रसिध्द गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांच्या सूर्योदय फाऊंडेशनने लाखो रुपयांचा निधी खर्च करून माणगाव तालुक्यातील साई खैरावाडी गावाची नादुरुस्त जलवाहिनी दुरुस्त केली आहे. साई खैरावाडी ग्रामस्थांनी रविवारी (दि. 28) ज्येष्ठ समाजसेवक कृष्णा महाडिक यांच्या सहकार्याने डॉ. अनुराधा पौडवाल यांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली व गावाला सुजलाम,सुफलाम बनवण्यासाठी काय करावे लागेल, यासाठी मार्गदर्शन घेतले.
साई खैरावाडी गाव अध्यक्ष प्रकाश धुमाळ, सदस्या प्रियंका धुमाळ, प्रतिभा दर्गे, जयवंती खेडेकर, मुबई मंडळाचे अध्यक्ष बबन दर्गे, सचिव सुनिल दर्गे, सल्लागार शांताराम खेडेकर, दत्ताराम तांबडे, विनायक महाडिक, बबन खेडेकर व ग्रामस्थांनी रविवारी डॉ. अनुराधा पौडवाल यांची भेट घेतली. या सदिच्छा भेटीदरम्यान त्यांनी साई खैरावाडी गावाला आदर्श व स्वयंपुर्ण बनवण्यासाठी आणि गावाला मुबलक पाणीपुरवठा कशापद्धतीने करता येईल, या संदर्भात तसेच ग्रामस्थांना स्वयंरोजगार उपलब्ध करण्याबाबत चर्चा केली.
पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या सूर्योदय फाऊंडेशनच्या माध्यमातून जलवाहिनी दुरुस्त केल्यामुळे खैरावाडी गावाला भरपूर प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी भाजीपाला शेती केली आहे. या भेटीदरम्यान ग्रामस्थांनी डॉ. पौंडवाल यांना भाजीपाला आणि फळभाज्या भेट दिल्या.