Breaking News

दिघोडे-गव्हाण फाटा महामार्गावर अवजड वाहनांवर कारवाई

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील दिघोडे-गव्हाण फाटा महामार्गावर नियमित होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे दैनंदिन प्रवासी अक्षरशः हैराण झाले आहेत. दिघोडेपासून ते गव्हाण फाट्यापर्यंत महामार्गालगत असलेल्या अनधिकृत कंटेनर गोदामांमधील अवजड कंटेनर ट्रेलर वाहतुकीमुळे सामान्य नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी 27 सप्टेंबरपासून सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात अवजड कंटेनर ट्रेलर वाहतुकीला बंदी घातली आहे. त्याचे पालन न करणार्‍या अवजड वाहनांवर उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गायकवाड यांच्या पथकाने कारवाईचा बडगा उगारला आहे. दिघोडे-गव्हाण फाटा महामार्गावर दिघोडे, वेश्वी, जांभूळपाडा, वाघधोंडी खिंड या रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी करून काही चालक महामार्ग ठप्प करीत असल्याने तासन्तास या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे आता नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करीत वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्‍या अवजड वाहनांवर जोरदार कारवाईची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे आता वाहतूक कोंडी सुरळीत होत असल्याने प्रवासी आणि सामान्य नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. या कारवाईमध्ये उरण वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय पवार, सहाय्यक उपनिरीक्षक संजय जाधव, नाईक रवींद्र पार्टे, विशाल भिसे यांचा सहभाग होता.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply