नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
सरकारद्वारे पॅनकार्ड-आधार कार्ड जोडणीसाठी देण्यात आलेली अंतिम मुदत वाढवण्यात आलेली आहे. याअगोदर पॅनकार्ड-आधार कार्ड जोडणीसाठी 30 सप्टेंबर ही मुदत देण्यात आली होती, तर, आता नवी अंतिम मुदत 31 डिसेंबर देण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिकांना पॅनकार्ड-आधार कार्ड जोडणी करून घेण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी मिळाला आहे. केंद्र सरकारने आधारशी जोडणी करणे बंधनकारक केले आहे. जे कोणी असे करणार नाही त्यांचे पॅनकार्ड अवैध मानले जाणार आहे. जर तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत 2019 पॅनकार्ड व आधारकार्ड जोडणी केली नाही, तर तुमचे पॅनकार्ड वापरात राहणार नाही. या अगोदर असा नियम होता की जर ठरलेल्या मुदतीत तुम्ही पॅनकार्ड व आधार कार्ड जोडणी केली नाही, तर तुमचे पॅनकार्ड अवैध समजले जाईल. म्हणजेच तुमच्याकडे पॅनकार्ड नाही असे मानले जाईल. म्हणजेच 1 जानेवारी 2020 पासून जोपर्यंत तुम्ही पॅनकार्डला आधारकार्डशी जोडत नाहीत. तोपर्यंत तुम्हाला प्राप्तिकर, गुंतवणूक किंवा कर्ज आदींशी निगडित कोणतीही कामं करता येणार नाहीत.