1 ऑक्टोबर हा ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. ’कोई लौटा दो मेरे बिते हुए दिन’ म्हणणार्या या ज्येष्ठांना सहानुभूती व्यक्त केली जाते. शासन आपल्या स्तरावर काही योजना जाहीर करून आपला सहभाग दाखवून देते. त्यांच्यावर कुटुंबातून होणार्या अत्याचारात वाढ होत असल्याने कुटुंबात त्यांचा सन्मान राखावा यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात संस्कारक्षम गोष्टींचा समावेश करण्याची सूचना शालेय विभागाला देण्याचे आश्वासनही सामाजिक न्यायमंत्र्यांनी दिले आहे.
आपण काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात बातम्या वाचल्या की, मुलगा परदेशात नोकरीला वडील मुंबईत. आलिशान ब्लॉकमध्ये त्यांचा मृत्यू होऊन दोन-तीन महिने झाले तरी कोणालाच समजले नाही. एवढेच कशाला काही दिवसांपूर्वी ठाण्याजवळ एका खेड्यात राहणार्या आपल्या वडिलांचा मृत्यू झाला, तर देशातच असणारी मुलगी गावकर्यांना कळवते की तुम्ही सगळे उरकून घ्या. मला व्हिडीओ पाठवा. आपले संस्कार कोठेतरी कमी पडतात असेच यावरून वाटायला लागते.
पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करणारी आजची पिढी आपली संस्कृती विसरायला लागली आहे. त्यामुळेच वृध्दाश्रमांची संख्या वाढत आहे.
एप्रिल, मे आणि जून हे तीन महिने म्हणजे सुटीची मजा घेण्याचे महिने. याच कालावधीत मदर्स डे म्हणजे मातृदिनही आपण 12 मे रोजी साजरा करतो. आईबरोबर सेल्फी काढून तो साजरा करतो. त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकतो, पण याच तीन महिन्यांत ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात दाखल होत असल्याची धक्कादायक माहिती सीबीडी पोलीस ठाण्यातील महिला व मुलांकरिता असलेल्या सहाय्यक कक्षातील सोशल वर्कर आसावरी जाधव यांनी दिली. एप्रिल महिना सुरू झाला की सगळ्यांना सुटीचे आणि फिरायला जाण्याचे वेध लागतात. आपल्या सहलीचे बेत ठरवताना घरातील ज्येष्ठ नागरिकांची तरुण पिढीला अडचण वाटायला लागते. त्यामुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास देण्याच्या घटना घडत असल्याची माहिती आसावरी जाधव यांनी दिली. अशा वेळी त्यांची वृध्दाश्रमात सोय करणे आर्थिकदृष्ट्या शक्य असतानाही नवी मुंबई आणि पनवेल महापालिका हद्दीतील उच्चशिक्षित भागात असे प्रकार घडत असल्याचे त्यांनी सांगितले.
पनवेलमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक संघ आहेत. आपल्या परिसरातील समस्या सोडवण्यासाठी आपली वेदना, दु:ख विसरून ते काम करीत असताना दिसतात. एकमेकांचे वाढदिवस साजरे करतानाच यावर्षी आपल्यातील कोण कमी झाला त्याच्याबद्दल दु:खही व्यक्त केले जाते. नवीन पनवेलमधील अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघ हा त्यापैकीच एक. या संघाचे 100पेक्षा जास्त सदस्य आहेत. ते पनवेल स्टेशनच्या पूर्वेला असलेल्या कट्ट्यावर रोज सकाळ-संध्याकाळ एकत्र येत असतात. यामध्ये विक्रीकर, रेल्वे, शिक्षण, पुरवठा अशा विविध शासकीय खात्यांतून, बँक, खासगी क्षेत्र, कामगार संघटना अशा क्षेत्रांतून निवृत्त झालेली अनुभवी माणसे आहेत. आपल्या सोसायटीतील विजेचा किंवा पाण्याचा प्रश्न असो, नाहीतर रेल्वे किंवा एनएमएमटीच्या बसचा प्रश्न तो सोडवण्यासाठी धडपडताना दिसतात. त्यासाठी वरिष्ठ अधिकार्यांच्या कार्यालयात फेर्या मारत असतात. तो प्रश्न सुटल्यावर त्यांच्या चेहर्यावर दिसणारा आनंद पाहण्यासारखा असतो.
यामधील अनेक प्रश्न सुटले नाही म्हणून यांचे काही अडणार नसते, तर आजच्या तरुण पिढीला आपल्याला भेडसावणारे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नसतो. त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम हे करीत असतात. अनेक वेळा येथून प्रवास करणार्या महिला त्यांचे वाहतुकीविषयीचे प्रश्न सांगतात. हे त्यासाठी पत्रव्यवहार करून कार्यालयात फेर्या मारून ते सोडवत असतात, पण त्याबद्दल कोणी त्यांचे आभार मानताना कधी दिसत नाही, पण गाडी बंद झाली की पुन्हा तक्रार करायला मात्र येतात. ज्येष्ठ महिलाही आपल्यावर नातेवाइकांकडून झालेल्या अन्यायाला येथे येऊन वाचा फोडतात. पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षारोपण करून त्यांची जोपासना करण्यासाठी धडपडत असतात.
महाराष्ट्रात शासनानेही ज्येष्ठ नागरिकांच्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यांनी आपल्या शाळा, उद्याने आठवड्यातून एकदा विनामूल्य उपलब्ध करून द्यावीत, असे सूचित केले आहे. त्यांच्यावर कुटुंबातून होणार्या अत्याचारात वाढ होत असल्याने कुटुंबात त्यांचा सन्मान राखावा यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात संस्कारक्षम गोष्टींचा समावेश करण्याची आणि राष्ट्रीय सण, उत्सवांना तज्ज्ञ ज्येष्ठ नागरिकांची व्याख्याने आयोजित करावीत, अशा सूचना शालेय विभागाला देण्याचे आश्वासन सामाजिक न्यायमंत्र्यांनी दिले आहे. अशा वेळी पनवेल तालुक्यातील दातार इन्स्टिट्यूटचे संजय दातार दरवर्षी रायगड जिल्ह्यातील वृध्दाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना आपल्या दातार इन्स्टिट्यूटमध्ये आणून त्यांचे पारंपरिक पध्दतीने स्वागत करून त्यांच्यासोबत सहकुटुंब एक दिवस घालवतात. त्यांच्यासह खेळ, गाणी जेवण असे कार्यक्रम दरवर्षी करतात. त्या वेळी संजय दातारांसारखा माणूस आपली संस्कृती टिकून असल्याची खात्री पटवतो.
-नितीन देशमुख