Breaking News

मेरीकोम, सरिता देवी यांची सुवर्ण कामगिरी

गुवाहाटी : वृत्तसंस्था

सहा वेळच्या विश्व चॅम्पियन एमसी मेरीकोम आणि एल. सरिता देवी यांनी अपेक्षित कामगिरी करताना इंडियन ओपन मुष्टीयुद्ध स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी सुवर्ण पदकाची कमाई केली. त्याच वेळी, आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण विजेत्या अमित पंघालनेही 52 किलो वजनी गटातून शानदार खेळ करताना जायंट किलर ठरलेल्या सचिन सिवाचचे आव्हान परतवून लावत सुवर्ण पटकावले.

या स्पर्धेत जबरदस्त दबदबा राखलेल्या भारताने पुरुष गटात चार, तर महिला गटात तीन सुवर्ण पदकांची लयलूट केली. स्पर्धेतील एकूण 18 सुवर्णपदकांपैकी 12 सुवर्ण पदकांवर भारताने कब्जा केला. गेल्या वर्षी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या स्पर्धेत भारताने सहा सुवर्ण पदके जिंकली होती. सरिता देवीने अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात सिमरनजीत कौरचा 3-2 असा पाडाव केला. 60 किलो वजनी गटातून पहिल्यांदाच खेळत असलेल्या सिमरनजीतने पहिल्या फेरीपासून दमदार खेळ केला, मात्र नंतर सरिताने पुनरागमन करत बाजी मारली. दुसरीकडे, दिग्गज मेरीकोमने मिझोरामच्या वनलाल दुआती हिचे आव्हान सहजपणे परतवले. 51 किलो वजनी गटातून पहिल्यांदाच खेळताना मेरीने आपला हिसका दाखवला. याच गटात निकहत जरीन आणि ज्योती यांनी कांस्य जिंकले. पुरुषांमध्ये शिव थापाने गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेत उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढताना गतविजेत्या मनीष कौशिकला लोळवले. 60 किलो वजनी गटात थापाने पहिल्या लढतीपासून निर्विवाद वर्चस्व राखले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply