Breaking News

रायगड उजळला

निकाल जाहीर होत असताना विरोधी पक्षांच्या काही नेत्यांनी महायुतीला मतदारांनी नाकारले अशी विधाने केली, परंतु स्पष्ट बहुमताचा कौल मिळालेल्या महायुतीला मतदारांनी नाकारल्याची हाकाटी करणे हा हास्यास्पद प्रकार आहे. चुकूनमाकून काही जागा आयत्या वाढल्यामुळे आता ईव्हीएमवर खापर तरी कसे फोडायचे अशी नवीच डोकेदुखी विरोधी पक्षाच्या नेत्यांना जडली असेल.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत अपेक्षित असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीच्या दणदणीत विजयाचे पहिले तोरण पनवेल मतदारसंघात लागले. पनवेल परिसरच नव्हे तर अवघ्या रायगड जिल्ह्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समर्थ नेतृत्वाखाली तडफेने लढलेल्या भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची शर्थ करून विजयश्री खेचून आणली आहे. मतदारांना गृहित न धरता निरपेक्ष भावनेने लोकांची कामे सातत्याने केल्याचे हे फळ आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाने त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवत भाजपचा किल्ला लढवून जिल्ह्यात विजयाचा आकाशदिवा उजळवला आहे. रायगड जिल्ह्यातील मतदारांनी यंदाच्या निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांचे नेतृत्व ठळकपणे अधोरेखित करत विरोधकांना त्यांची जागा दाखवली. रायगड जिल्हा हा शेतकरी कामगार पक्षाचा एकेकाळी बालेकिल्ला होता. 2014च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजप एक, तर शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडे प्रत्येकी दोन जागा होत्या, परंतु यंदाच्या निवडणुकीत शेकापला जिल्ह्यात एकही जागा मिळालेली नाही. यंदा जिल्ह्यात शिवसेनेेला तीन, भाजपला दोन आणि एक भाजप बंडखोर तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाली आहे. जिल्ह्यात महायुतीला अपेक्षेनुसार यश मिळाले असले तरी राज्यात भाजप आणि मित्रपक्ष शिवसेना यांच्या काही जागा कमी झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला तुलनेने बरे यश मिळाल्याचे चित्र आहे, परंतु या निकालांमध्ये विरोधीपक्षांनी हुरळून जाण्यासारखे काहीही नाही. 2014च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढले होते. त्यावेळी 260 जागा लढवून भाजपने 122 जागांवर विजय मिळवला होता. यंदा भाजपने फक्त 150 जागा लढवून सुमारे 103 जागांवर यश प्राप्त केले आहे. याचा अर्थ भाजपचा स्ट्राइक रेट जवळपास 70 टक्क्यांपर्यंत पोहोचतो. ही आकडेवारी आणि मतांची टक्केवारी पाहता भाजपचे यंदाचे यश 2014पेक्षा थोडेसे जास्तच आहे. हीच मोजपट्टी मित्रपक्षाच्या यशालाही लावता येईल. निवडणुकीआधीच गलितगात्र झालेल्या या विरोधकांना यंदाच्या निवडणुकीत थोडाफार फायदा झाला, तो मतदारांनी महायुतीकडे पाठ फिरवल्याचा नव्हे. महायुतीने एकत्र लढलेल्या जागी भाजप-शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात जी बंडखोरी झाली त्याचा लाभ आघाडीला मिळाला. भारतीय जनता पक्षात स्थापनेपासूनच असलेल्या पक्षशिस्तीनुसार त्यावर योग्य ते चिंतन होईल व त्यात दुरुस्तीदेखील केली जाईल. म्हणूनच महायुतीच्या फक्त 20-22 जागा कमी झाल्याबद्दल ओरड करणे अनाठायी आहे. कारण या निकालामुळे कुठलाच फरक पडणार नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार दुसर्‍या टर्मसाठी सज्ज होणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेने स्वत:ला दिलेली ही दिवाळीभेट आहे असेच या निकालाचे वर्णन करावे लागेल.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply