अतिरिक्त 50 हजार रुपये काढता येणार
![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2019/10/pmc-bank-scam.jpg)
मुंबई : प्रतिनिधी
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पीएमसी बँक खातेदारांना आता 40 हजारांशिवाय अतिरिक्त 50 हजार रुपये काढता येणार आहेत. महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. निकडीचा प्रसंगाच्या वेळीच ही 50 हजार रुपयांची रक्कम काढता येऊ शकेल. पीएमसी बँकेचे सुमारे 17 लाख खातेदार आहेत, तर बँकेवर 11 हजार 500 कोटी रुपयांचं आर्थिक संकट आहे. बँकेत अनेकांची लाखो रुपयांची एफडी, सॅलरी अकाऊंट आहेत. किरीट सोमय्या यांच्या ट्विटनुसार, शिक्षण, आजारपण, यांसारख्या अत्यावश्यक गरजेसाठी पीएमसी बँकेचे खातेदार आता अतिरिक्त 50 हजार रुपये काढू शकतात. पैसे काढण्यासाठी खातेदारांना त्यांना बँकेच्या शाखेत अर्ज करावा लागेल. मेडिकल इमर्जन्सीसाठी खातेदारांना डॉक्टरने दिलेल्या अंदाजित खर्चाची माहिती द्यावी लागेल. मेडिकल सर्टिफिकेट, मेडिकल रिपोर्ट आणि उपचारांचं बिलही बँकेत जमा करावं लागलं. सर्वात आधी आरबीआयने पैसे काढण्याची मर्यादा केवळ 1000 रुपये निश्चित केली होती. त्यानंतर ती वाढवून 10,000 रुपये करण्यात आली होती. मग आरबीआयने 3 ऑक्टोबर रोजी बँक ग्राहकांना आपल्या खात्यातील जमा रकमेपैकी 25,000 हजार रुपये काढण्याची परवानगी दिली. यानंतर खातेदारांनी जोरदार गोंधळ घालत निषेध व्यक्त केल्याने आरबीआयने पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आणि ती 40 हजार रुपये केली.