कोकण किनारपट्टीवरील रायगड जिल्ह्याला वादळे नवी नाहीत. पावसाळ्यात जिल्ह्यामध्ये अनेकदा वावटळी उठतात. यंदा सोसाट्याच्या वार्यासह अतिवृष्टीने थैमान घातले. अगदी दिवाळी आली तरी वादळ आणि पाऊस कायम आहे. अशातच जिल्ह्यातील मतदारांनी विधानसभा निवडणुकीत प्रस्थापित पक्षांना विशेषतः शेतकरी कामगार पक्षाला अक्षरशः झोडपून काढले. भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीच्या चक्रीवादळात शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाआघाडीची पुरती वाताहत झाल्याचे चित्र आहे.
अलिबागेत महेंद्र दळवी ठरले ‘जाएंट किलर’
जिल्ह्याचे मुख्यालय आणि शेकापचा बालेकिल्ला असलेल्या अलिबाग मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे महेंद्र दळवी निवडून आले. त्यांनी विद्यमान आमदार सुभाष ऊर्फ पंडित पाटील यांना दुसर्या प्रयत्नात पराभवाची धूळ चारली. या मतदारसंघात 70 वर्षांच्या इतिहासात शेकापचा केवळ चारदाच पराभव झाला तोही काँग्रेसकडून. या वेळी शिवसेनेचे उमेदवार दळवी ‘जाएंट किलर’ ठरले. प्रकल्पांना विरोध, स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष, युवकांना रोजगार मिळवून देण्यात अपयश आदी कारणांमुळे अलिबागमधील लोक शेकापवर नाराज होते. येथे शेकापने काँग्रेससोबत मैत्रीपूर्ण लढत देत ती मते दळवींकडे वळू नये अशी तजवीज केली होती, मात्र ही खेळी शेकापच्याच अंगलट आली. काँग्रेस उमेदवार श्रद्धा ठाकूर पाचव्या क्रमांकावर फेकल्या गेल्या. त्यांच्यापेक्षा जास्त मते एका अपक्ष उमेदवाराने घेतली, तर काँग्रेसमधून बंडखोरी केलेले राजा ठाकूर तिसर्या स्थानी राहिले. तेही विशेष मते मिळवू शकले नाहीत. दुसरीकडे भाजपने आपली संपूर्ण ताकद दळवी यांच्या पाठीशी उभी केली. त्यामुळे ते पाचएक हजार मतांनी विजयी होतील, असा कयास पत्रकारांमधून बांधला जात होता. प्रत्यक्षात दळवी 32 हजार 924 एवढ्या मतांनी विजयी झाले. यावरून अलिबागच्या जनतेने परिवर्तन करायचे ठरविले होते, हे स्पष्ट होते.
प्रमुख उमेदवार, पक्ष व मिळालेली मते
महेंद्र हरी दळवी, शिवसेना 111946 (विजयी)
सुभाष ऊर्फ पंडित पाटील, शेकाप 79022
पेणमध्ये रविशेठ पाटील यांचे झोकात पुनरागमन
पेणमध्ये माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी पराभवाचे चक्रव्यूह भेदत विजयाला शानदारपणे गवसणी घातली. त्यांनी शेकापचे धैर्यशील पाटील यांची हॅट्ट्रिक चुकवित सलग दोन पराभवांचे उट्टे फेडले. विशेष म्हणजे याच रविशेठ यांनी 2004मध्ये धैर्यशील यांचे वडील, माजी मंत्री (कै.) मोहन पाटील यांची डबल हॅट्ट्रिक रोखली होती. पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून रविशेठ पाटील यांनी आठ महिन्यांपूर्वी काँग्रेसला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांचा हा निर्णय योग्य ठरला. मंत्रिपदाच्या काळात केलेल्या कामाची पुण्याई त्यांच्या कामी आली. शिवाय त्यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेच्या माध्यमातून पेण शहराचा चेहरामोहरा बदलण्यात आला. त्याचेही फळ मिळाले. अलिबागमध्ये जसा भाजपने शिवसेना उमेदवाराचा प्रचार करून युतीधर्म पाळला, तशाच प्रकारे पेणमध्ये शिवसेनेने भाजपला साथ दिली. त्यामुळे रविशेठ 24 हजार 51 मतांनी विजयी झाले. जातीपातीचे राजकारण आणि बंडखोरीचा फायदा उठवित धैर्यशील पाटील दोनदा आमदार झाले होते. या वेळी मात्र त्यांची डाळ शिजली नाही. विकासाच्या दृष्टीने पाटी कोरी असल्याने जनतेने त्यांना घरी बसविले. काँग्रेसच्या उमेदवार नंदा म्हात्रे, शेकापने उभे केलेले रवि पाटील असे नामसाधर्म्य असलेले दोन अपक्ष व इतर उमेदवार आपले डिपॉझिट वाचवू शकले नाहीत.
प्रमुख उमेदवार, पक्ष व मिळालेली मते
रविशेठ पाटील, भाजप 112380 (विजयी)
धैर्यशील मोहन पाटील, शेकाप 88329
महेंद्र थोरवेंकडून कर्जतमध्ये परिवर्तन
जिल्ह्यात तिसरा धक्का बसला तो राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जतमधील आमदार सुरेश लाड यांना. शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांनी त्यांना सलग तिसर्यांदा व एकूण चौथ्यांदा आमदार होण्यापासून या वेळी वंचित ठेवले. गेल्या निवडणुकीत शेकापच्या तिकिटावर लढून पराभूत झालेले थोरवे यंदा शिवसेनेकडून उमेदवारी मिळविण्याबरोबरच विजयी होण्यातही यशस्वी झाले. पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मावळमधील एकमात्र कर्जत विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतांची आघाडी मिळाली होती. त्यातच शिवसेनेचे हनुमंत पिंगळे यांचे पक्षांतर आणि सुरेश टोकरेही स्वगृही परतल्याने लाड यांचे पारडे जड झाले होते. नेत्यांची ‘भाऊ’गर्दी झाली असली, तरी शेकाप, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची संघटनात्मक साथ राष्ट्रवादीला मिळाली नाही. परिणामी शिवसेना-भाजपच्या एकजुटीपुढे महाआघाडी फिकी पडली आणि कर्जत नगर परिषदेच्या निकालाची पुनरावृत्ती झाली. 18 हजार 46 मतांनी थोरवे विजयी झाले.
प्रमुख उमेदवार, पक्ष व मिळालेली मते
महेंद्र सदाशिव थोरवे, शिवसेना 102208 (विजयी)
सुरेश नारायण लाड, राष्ट्रवादी काँग्रेस 84162
उरणमध्ये महेश बालदी यांनी गाजवला भीमपराक्रम
उरणच्या रिंगणात अपक्ष म्हणून निवडणूक लढलेले भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी यांनी शिवसेनेचे मनोहर भोईर आणि शेकापचे विवेक पाटील या दोन आजी-माजी आमदारांना हरविण्याचा करिष्मा केला आहे. मतदारसंघाचा विकास हीच माझी जात अन् जनतेची प्रगती हाच माझा धर्म असल्याचे सांगत त्यांनी लढवय्या योद्ध्याप्रमाणे रणांगण गाजविले आणि विजयाचे तोरणही बांधले. रायगड जिल्ह्यातील उरणच्या लढतीकडे अनेकांचे लक्ष लागले होते; कारण येथील लढत तिरंगी होती. उरणकरांना न्याय मिळवून देण्यात शेकापचे तत्कालीन आमदार विवेक पाटील अपयशी ठरल्याने मागील निवडणुकीत जनतेने त्यांना नाकारत शिवसेनेचे मनोहर भोईर यांना संधी दिली होती, पण भोईर यांच्या तुलनेत महेश बालदी यांनी लोकप्रतिनिधी म्हणून कुठलेही पद नसताना कोट्यवधी रुपयांची विकासकामे करून आगामी काळात कसा विकास करणार याची आस मतदारांमध्ये जागवली. याचा सकारात्मक परिणाम होऊन तीन तालुक्यांत पसरलेल्या या मतदारसंघाला बालदी यांच्या रूपाने नवा दमदार नेता मिळाला आहे. त्यांनी आमदार मनोहर भोईर यांचा पाच हजार 710 मतांनी पराभव केला. माजी आमदार विवेक पाटील तिसर्या क्रमांकावर फेकले गेले.
प्रमुख उमेदवार, पक्ष व मिळालेली मते
महेश बालदी, अपक्ष 74549 (विजयी)
मनोहर गजानन भोईर, शिवसेना 68839
विवेक पाटील, शेकाप 61601
आमदार प्रशांत ठाकूरांशिवाय पनवेलला पर्याय नाही
पनवेल आणि आमदार प्रशांत ठाकूर हे समीकरण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अधिक घट्ट झाले आहे. तब्बल 92 हजार 730 एवढे मताधिक्य मिळवून त्यांनी विजयी हॅट्ट्रिक साधताना कोकणातून सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा बहुमानदेखील मिळविला. आमदार प्रशांत ठाकूर यांचा विजय निश्चितच होता. फक्त तो ते किती मतांनी साकारतात हीच औपचारिकता होती, पण कमी झालेले मतदान पाहता आमदार ठाकूर यांना अपेक्षित यश मिळणार नाही, असे अनेकांना वाटत होते. प्रत्यक्षात या कार्यतत्पर लोकप्रतिनिधीने दणदणीत विजय संपादन केला. सुमारे 60 टक्के मतदान झाले असते तर त्यांनी नियोजित एक लाख मताधिक्याचा आकडा सहज पार केला असता. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी झाल्याप्रमाणे 65-70 टक्के मतदानात ते सव्वा ते दीड लाख मताधिक्याजवळ पोहोचले असते.याची पूर्ण जाणीव असल्याने शेकापने खास मोहरा मैदानात न उतरवता हरेश केणी हा नवखा उमेदवार पुढे केला होता, मात्र त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
प्रमुख उमेदवार, पक्ष व मिळालेली मते
प्रशांत रामशेठ ठाकूर, भाजप 179109 (विजयी)
हरेश मनोहर केणी, शेकाप 86379
महाडमध्ये पुन्हा एकदा आमदार भरत गोगावलेच
महाडमध्ये आमदार भरत गोगावले यांनी आपले वर्चस्व अबाधित राखले आहे. त्यांनी स्वतःच्या विजयाची, तर प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेस जिल्हाध्यक्ष माणिक जगताप यांना पराभूत करण्याची हॅट्ट्रिक केली. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे मदतीची परतफेड करतील, अशी अपेक्षा जगतापांना होती, मात्र आमदार गोगावले यांनी 21 हजार 575 मतांनी विजय प्राप्त केला. त्यामुळे तटकरेंनी वरून प्रचार करून आतून पुन्हा एकदा फसविल्याची भावना काँग्रेसजनांमध्ये आहे. अर्थात, गोगावलेंची ताकद व मतदारांशी संपर्क दुर्लक्षित करता येणारा नाही.
प्रमुख उमेदवार, पक्ष व मिळालेली मते
भरत गोगावले, शिवसेना 102273 (विजयी) माणिक मोतीराम जगताप, काँग्रेस 80698
श्रीवर्धनमध्ये आदिती तटकरे राष्ट्रवादीच्या नव्या आमदार
जिल्ह्यात महाआघाडीला फक्त एका ठिकाणी यश मिळाले ते म्हणजे श्रीवर्धनमध्ये. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने राखली. येथून राष्ट्रवादीचे बडे नेते खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती निवडून आल्या आहेत. त्यांनी शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांना मात दिली. श्रीवर्धनमध्ये महाआघाडीत झालेली बंडखोरी आणि मुस्लीम लीगचा उमेदवार लक्षात घेता आदिती यांना काही प्रमाणात फटका बसेल, असे म्हटले जात होते, पण या सर्वांचा काहीही फरक आदिती यांना पडला नाही. त्या 39 हजार 621 मतांनी निवडून आल्या. सुनील तटकरे स्वतः खासदार आहेत. त्यांचा मुलगा अनिकेत विधान परिषदेचा सदस्य आहे. आता मुलगी आदिती विधानसभेत गेल्याने वडील खासदार आणि दोन्ही अपत्ये आमदार असे घरातच अनोखे सभागृह तयार झाले आहे.
प्रमुख उमेदवार, पक्ष व मिळालेली मते
आदिती सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस 92074 (विजयी); विनोद रामचंद्र घोसाळकर, शिवसेना 52453
एकंदर रायगड जिल्ह्यात महायुतीने इतिहास रचला आहे. सातपैकी सहा जागी महाआघाडीला अस्मान दाखवून रायगडचे मैदान महायुतीने मारले. भाजपने दोन अधिक एक बंडखोर अशा मिळून तीन, शिवसेनेने तीन, तर राष्ट्रवादीने एक जागा जिंकली. यानिमित्ताने जिल्ह्यातून शेकापचा सुपडा साफ झाला आहे. पक्षाच्या आजवरच्या इतिहासात अशी नामुष्की शेकापवर यापूर्वी कधी आली नव्हती. काँग्रेसच्या पदरीही भोपळा आला. हे कल अनाकलनीय आणि धक्कादायक मुळीच नाहीत. यातील काही जागांचा अंदाज यापूर्वीच आला होता, पण मतांची तफावत इतकी राहील, असे कुणालाही वाटले नव्हते. जिल्ह्यातील लोक प्रस्थापित पक्ष आणि त्यांच्या पुढार्यांना कंटाळले आहेत, हेच यातून अधोरेखित होते.
-समाधान पाटील (मो. क्र. 9004175065)