जगातील अनेक विकसित देश अमेरिकन डॉलरसाठी पर्याय निवडण्याच्या प्रयत्नात आहेत, सोन्याच्या भावात इतकी तेजी येण्याचे हे एक कारण आहे. त्याव्यतिरिक्त सोन्याच्या किमती वाढण्याचे दुसरे कारण म्हणजे अमेरिका आणि चीन यांच्यातील वाढत्या व्यापारीयुद्धातही आहे. त्यामुळे जागतिक मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत सोने खरेदी हाच गुंतवणूकदारांना योग्य पर्याय वाटतो आहे.
दिवाळीच्या आधीपासूनच सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होताना दिसते आहे. भारतात सोन्याच्या दागिन्यांना, सोन्याला महत्त्व दिले जात असल्याने देशात सोन्याला मोठी मागणी आहे. भारत जगातील दुसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोन्याची मागणी असणारा देश आहे. सोन्याची ही मागणी पूर्ण करण्यासाठी भारताला सोने आयात करावे लागते. त्यामुळे मंदीच्या काळात सोन्याची मागणी कमी असणे, अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने फायद्याची गोष्ट आहे. आर्थिक मंदीमुळे सध्या सोन्याची आयात कमी झाल्याने व्यापारीतूटही कमी झालेली आहे. भारतासारख्या विकसनशील देशाला सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर नाही. प्रतिवर्षी जीडीपीमधील तीन टक्के रक्कम ही सोन्याच्या खरेदीच्या रूपात खर्च होते आणि हा अनुत्पादक खर्च आहे. या वर्षीच्या म्हणजेच 2019च्या सुरुवातीपासून देशात सोन्याची आयात कमी होत असल्याचे स्पष्ट झाले. सर्वसाधारणपणे दिवाळीसारख्या सणावारांच्या काळात सोन्याला जास्त मागणी असते, साहजिकच भारताची सोन्याची आयातही वाढते. गेल्या काही वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास सोन्याची आयात गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत खालच्या पातळीवर आली आहे. गेल्या महिन्यात भारताने 26 टन सोने आयात केले होते. एक वर्षापूर्वीच्या 81.71 टनापेक्षा ते कमी आहे. या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये सोन्याची मागणी वाढली, तरीही सोन्याची आयात 50 टक्क्यांपेक्षा कमी राहाण्याची लक्षणे दिसताहेत. सध्या देशातच नव्हे तर जगातच सोन्याच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. अर्थात सामान्यांसाठी न परवडणारे सोने हे मोठ्या गुंतवणूकदारांसाठी मात्र लाभाची संधी घेऊन येते. जगभरातच अर्थव्यवस्थेत मंदी आलेली आहे. जमीन व्यवहार थंड पडले आहेत. शेअरबाजारातही चढ-उतार कायम आहे. सोन्याचे भाव वाढलेले असले, तरीही मंदीच्या परिस्थितीतही सोन्यातील गुंतवणूक ही छोट्या मोठ्या गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित आणि आकर्षक पर्याय आहे. तज्ज्ञांच्या मतेही शेअरबाजार, रिअल इस्टेट आणि सोने या गोष्टींतील गुंतवणूक या सर्वाधिक लाभ देणार्या गोष्टी आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांत सोन्यातील गुंतवणूक फारशी फायदेशीर न ठरताही गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला गुंतवणूक तज्ज्ञांकडून दिला जात आहे. भारतात गुंतवणुकीसाठी चार मोठे पर्याय आहेत. सोने, रिअल इस्टेट, शेअरबाजार आणि बचत योजना. गेल्या काही वर्षांत म्हणजे 2013 नंतर सोन्याची गुंतवणुकीचा पर्याय म्हणून असणारी चमक कमी झाली आहे. त्याच वेळी सरकारने सोन्यावरील आयातशुल्क वाढवून सोन्याच्या आयातीवर निर्बंध लावल्याने सोने खरेदीदारांच्या उत्साहाला लगाम लावला होता. त्यामुळे सर्वोच्च पातळी गाठलेल्या सोन्याच्या भावात वेगाने घट झाली, परंतु आता अन्य पर्यायात खात्री नसल्याने सोन्याच्या गुंतवणुकीकडे लोक वळलेले दिसतात. परिणामी आयात वाढल्याने सोन्याचे दर वाढत आहेत. दसर्याला वाढलेले दर दिवाळीपर्यंत वाढतच गेले आहेत. पुढेही सोने चमकतच राहील.