सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची ग्वाही
पनवेल ः रामप्रहर वृत्त
कामोठे, कळंबोलीतील मुस्लीम समाजाची अडचण लक्षात घेता लवकरच न्यासाची मागणी पूर्ण होईल व सर्व मुस्लीम बांधवाना नमाज अदा करण्यासाठी पर्यायी जागा किंवा स्वतःच्या हक्काच्या मालकीचा भूखंड मिळेल, असे आश्वासन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या आश्वासनामुळे कामोठे व पनवेल परिसरातील मुस्लीम बांधवांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. न्यासाचे सर्व पदाधिकारी व भाजपचे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश सचिव तथा रायगड जिल्हा प्रभारी सय्यद अकबर यांनी उपस्थित न्यासाचे पदाधिकारी व मुस्लीम बांधवांसमोर आपले विचार व्यक्त करताना आमदार प्रशांत ठाकूर यांचे मुस्लीम बांधवांच्या वतीने जाहीर आभार मानले.
सिडकोमार्फत सामाजिक व धार्मिक प्रयोजनासाठी सुन्नी गौसिया चिस्तीया चॅरिटेबल ट्रस्ट, कामोठे या न्यासासाठी कामोठे येथे मुस्लीम बांधवांना नमाज अदा करण्यासाठी तात्पुरता भूखंड मिळण्यासाठी किंवा स्वतःच्या मालकीचा हक्काचा भूखंड मिळण्यासाठी सिडकोकडे मागणी करण्यात आली होती. याबाबत भारतीय जनता पार्टी कामोठे कार्यालयात मुस्लीम समाज बांधवांसोबत सिडको अध्यक्ष आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी बैठक घेतली. या बैठकीस नगरसेवक विकास घरत, युवा नेते हॅप्पीसिंग, भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश सचिव तथा रायगड जिल्हा प्रभारी सय्यद अकबर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. या वेळी सुन्नी गौसिया चिस्तीया चॅरिटेबल ट्रस्ट कामोठेचे अध्यक्ष लाबुद्दीन शेख, इमरान शेख, उमर खान, असरार शेख, नायाब शेख, शहजाद मन्सुरी यांच्यासह शेकडो मुस्लीम बांधव या वेळी उपस्थित होते. न्यासामार्फत कामोठे येथील सेक्टर-12मध्ये भाड्याची जागा घेऊन तेथे तात्पुरती नमाज अदा करण्याची व्यवस्था केली आहे. कामोठे परिसरात राहणारे सुमारे 1000 ते 1500 मुस्लीम नागरिक तेथे नियमित नमाज आदा करीत आहेत.
नगरसेक दिलीप पाटील यांनी त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेत मोठ्या मनाने या सर्व मुस्लीम बांधवाना तात्पुरत्या स्वरूपात नमाज पठण करण्यास जागा दिली होती, परंतु त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे या जागेत आता मुस्लीम बांधवाना नमाज आदा करण्यासाठी देता येणार नाही. ही भाड्याची जागा लवकरात लवकर खाली करण्याबाबत जागा मालकाने न्यासाला कळविले आहे. त्यामुळे नमाज आदा करण्यासाठी कामोठे येथे राहणार्या मुस्लीम बांधवांची अडचण होणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी तात्पुरती किंवा कायमस्वरूपी जागा देण्याचे आश्वासन दिले आहे. सिडकोने दिलेल्या भूखंडाच्या मोबदल्यात त्यासाठी आवश्यक ते शुल्क
भरण्यास न्यास तयार आहे, अशी ग्वाही देखील न्यासाच्या पदाधिकार्यांनी या वेळी दिली.