Breaking News

अलिबाग-मुरूड रस्त्यावरील खड्डे शेकापला भोवले

अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघावर गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षाचा आमदार निवडून येत आहे, परंतु 2019 विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त करून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार पंडितशेठ पाटील यांचा दारुण पराभव केला आहे.

यंदाची विधानसभा निवडणूक ही शेकाप विरुद्ध शिवसेना यांच्यात होऊन इतर उभे असणार्‍या अन्य उमेदवारांना कमी मताधिक्य मिळाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे अलिबाग-मुरूड विधानसभा क्षेत्रात शिवसेना व शेकाप यांच्यात सरळ लढत होऊन शिवसेनेचे महेंद्र दळवी यांनी मोठे मताधिक्य मिळवून आपला विजय साजरा केला आहे.

सदरची निवडणूक ही अटीतटीची होईल असा सर्वसामान्य नागरिकांचा कयास होता, परंतु दळवी यांनी सुयोग्य नियोजन, धूर्त प्रणालीचा वापर केल्याने या मतदारसंघात प्रथमच शिवसेनेला विजय गाठता आला आहे. रायगड जिल्ह्यात अनेक शैक्षणिक संस्था व बँक याचे मोठे जाळे त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेवर असणारे प्राबल्य यामुळे शेतकरी कामगार पक्षाची मोठी ताकद या मतदारसंघावर होती, तर याउलट शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी दुसरी वेळ ही निवडणूक लढवली होती. शेतकरी कामगार पक्षाची युती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत होती, तर काँग्रेस आय पक्षाचे दोन उमेदवार एक अधिकृत, तर एक अपक्ष राहिल्याने या दोघांनाही जनसमर्थन न मिळाल्याने दारुण पराभव या निवडणुकीत सहन करावा लागला.

अलिबाग-मुरूड विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार यांना मिळालेली मते एक लाख 11 हजार 946, तर शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार पंडितशेठ पाटील यांना 79 हजार 22, तर राजेंद्र ठाकूर यांना 11 हजार 891, अश्रफ घट्टे यांना 2920, काँग्रेस आयच्या उमेदवार श्रद्धा ठाकूर यांना 2526, वंशीय बहुजन आघाडीचे उमेदवार रविकांत पेरेकर 1139, अनिल बबन गायकवाड 756, चिंतामण पाटील 725, श्रीनिवास मट्टपर्ती 414, संदीप सारंग  लोकभारती पक्षाचे उमेदवार 359, दिनकर खरिवले 366, हेमलता पाटील प्रहार जनशक्ती पार्टी 303, आनंद नाईक 145 व नोटाला 2313 अशी मते पडली आहेत.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी सर्वात मोठा एक लाखपेक्षा जास्त मताधिक्याने मत प्राप्त केल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भारतीय जनता पार्टीचा विस्तार मोठा असून अलिबाग-मुरूड विधानसभा क्षेत्रात मोठी मतदार संख्या असून युतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांना याचा मोठा फायदा होणार असून कोणत्याही परिस्थितीत महेंद्र दळवी यांचा विजय निश्चित असून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला सारून एकदिलाने युतीचा उमेदवार निवडून आण्यासाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे अलिबाग-मुरूड विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी या निवडणुकीत दिल्याने भाजप कार्यकत्यांनी मोठी मेहनत घेत शिवसेनेच्या या विजयात मोठा हातभार लावला आहे.

शेकापचे विद्यमान आमदार पंडितशेठ पाटील यांच्यावर लोकांचा अलिबाग-मुरूड रस्त्याला पडलेले खड्डे याबाबत मोठा राग होता. गेली अनेक वर्षे या रस्त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्याने लोकांचा राग वाढतच चालला होता. फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅप यावर रस्त्याबाबत तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या जात होत्या.त्यामुळे रस्ते हे त्यांच्या प्रभावाचे प्रमुख कारण मानले जात आहे.त्याचप्रमाणे शेतकरी कामगार पक्षाचा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची असणारी मते शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार पंडित पाटील यांना न मिळता ती सर्व मते शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी यांना वळती झाली आहेत.

मुरूड तालुका व रोहा तालुक्यातील चणेरा जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादी शेकापच्या सोबत असताना तो दिखावा म्हणून राहिला, परंतु या भागातील मते शिवसेनेला मिळाल्यामुळे शेकापच्या उमेदवारास मोठा पराभव पत्करावा लागला आहे. गेली अनेक वर्षाची सत्ता मित्र पक्षाचा दगा व रस्त्यावरील खड्डे यांचा सर्वस्वी परिणाम शेकापच्या उमेदवारास होऊन शिवसेना-भाजप पक्षाचे उमेदवार महेंद्र दळवी यांना झाला आहे. त्यामुळे 32 हजारच्या मोठ्या फरकाने शिवसेना उमेदवार विजयी झाले आहेत.

गेली अनेक वर्षे असणारी सत्ता गमावल्यामुळे शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्ह्यात एकही जागा आणू न शकल्याने अस्तित्व गमावून बसला आहे. अलिबाग-मुरूड विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात विद्यमान आमदार पाटील यांच्या विरोधात व्यक्तिद्वेष दिसून येऊन मोठे मताधिक्य विरोधात गेल्याने याचा फायदा महेंद्र दळवी यांना झालेला आहे. भारतीय जनता पार्टीचे बहुमूल्य सहकार्य व त्याची असणारी पारंपरिक मतेसुद्धा दळवी यांच्या पारड्यात पडल्याने शिवसेनेचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होण्यास मदत झाली आहे.

-संजय करडे, खबरबात

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply