महाडमध्ये मुंबई-गोवा महामार्गावर मध्यवर्ती ठिकाणी अपघातप्रसंगी तत्काळ वैद्यकीय उपचार मिळावा म्हणून 15 वर्षांपूर्वी ट्रॉमा सेंटर हॉस्पिटल उभारण्यात आले. त्यावेळचे आमदार माणिक जगताप यांनी याबाबत शासनाकडे पाठपुरावा करून हे रुग्णालय या ठिकाणी आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, मात्र अल्पावधीतच हे रुग्णालय प्रशासकीय आणि राजकीय अनास्थेचे बळी ठरले आहे. दरदिवशी सुमारे 200 ते 300 रुग्ण संख्या तपासणीसाठी येत असतानादेखील सोयीसुविधांचा अभाव कायम राहिला आहे. ग्रामीण रुग्णालय आणि ट्रॉमा केअर सेंटर हे एकाच इमारतीत असूनही डॉक्टर्स आणि उपकरणांच्या अभावी या ठिकाणी गरीब रुग्णांना उपचार मिळणे अवघड झाले आहे. गोरगरिबांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. सदर रुग्णालयाचा उद्देश हा सर्वसामान्यांना माफक दरात चांगली वैद्यकीय सेवा मिळणे हा असला तरी सध्या याचा फायदा खासगी हॉस्पिटल आणि डॉक्टर घेत आहेत आणि त्यामुळेच सर्वसामान्य रुग्णांची पिळवणूक होत आहे. हे भव्य रुग्णालय उपचारांअभावी ओस पडू लागले आहे.
महाडचे ट्रॉमा केअर सेंटर एकीकडे कोकणातील आणि विशेषतः महामार्गावरील अपघातग्रस्तांना आशेचा किरण असतानाच स्वत:च आजारी होऊन बसले आहे. इमारत बांधकाम खर्चापासून त्यानंतर देखभाल दुरुस्तीवर वारंवार खर्च करण्यात आला, मात्र इमारतीमधील सोयीसुविधांचा बोजवारा उडाला आहे. महाडमध्ये झालेल्या ट्रॉमा केअर सेंटरचा लाभ महाड तालुक्याला होणार होताच, शिवाय शेजारील माणगाव, गोरेगाव, पोलादपूरमधील
नागरिकांनादेखील खासगी रुग्णालयातील अनाठायी खर्चापासून मुक्ती मिळणार होती. या ठिकाणी स्त्रियांचे आजार, लहान मुलांचे आजार, अस्थिव्यंग, दंतचिकित्सा, नेत्रतपासणी यांसारख्या आजारांवर उपचार घेणे शक्य होणार होते. ट्रॉमाची निर्मिती करताना स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, अस्थिरोगतज्ञ, दंतचिकित्सक आणि इतर आजारांवरील तज्ञ डॉक्टरांचे पथक नियुक्ती केले जाणार होते, मात्र ट्रॉमाचे उद्घाटन झाल्यापासून अधीक्षक म्हणून काम करणारे डॉ. भास्कर जगताप हेच रुग्णालय सांभाळत होते. या ठिकाणी त्यांच्याकडे उपचार करून घेण्यासाठी दररोज शेकडो रुग्ण ट्रॉमामध्ये दाखल होत होते. त्यांच्या काळात महत्त्वाच्या सर्जरी स्वस्त आणि मोफत होत होत्या. तसेच मोठ्या संख्येने बाळंतणींची सुखरूप सुटका होत होती. क्वचितच कोणत्या महिलेची शस्त्रक्रिया होत असे. डॉ. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॉमा
केअरमध्ये शस्त्रक्रिया होत असल्याने गरिबांना याचा मोठा आधार होता,
मात्र महाड येथे तज्ञ डॉक्टर येत नसल्याने डॉ. जगताप यांना तारेवरची कसरत करून रुग्णालयाचा कारभार सांभाळावा लागत होता. येणारे अन्य डॉक्टर हे काही काळातच रुग्णालय सोडून गेले होते. यामुळे अपघातप्रसंगी आणि एखादी नैसर्गिक आपदा आल्यास या रुग्णालयात उपलब्ध कर्मचारी आणि डॉक्टरांवर ताण पडत होता. भूलतज्ञ नसल्याने शस्त्रक्रिया करताना अन्य खासगी डॉक्टरला बोलवावे लागत असल्याने त्याचा भुर्दंड रुग्णांवर पडत आहे. कर्मचारी अभाव असला तरी या ठिकाणी आधुनिक यंत्रणे अभावीदेखील रुग्णांना उपचारासाठी बाहेर जावे लागत आहे. महाड ट्रॉमा केअर सेंटरला आधुनिक यंत्रणेमध्ये सोनोग्राफी यंत्र, एक्सरे, डायलेसीस सेंटर, आधुनिक शस्त्रक्रिया विभाग, मृतदेह ठेवण्यासाठी डीप फ्रीज यंत्रणा, रक्त साठवणी यंत्र आणि तज्ञ, ऑपरेटर्स आणि टेक्निशियन यांची गरज आहे, मात्र जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गवळी आणि अधीक्षक डॉ. जगताप यांच्यातील वादामुळे महाड ट्रॉमा केअर कायम उपेक्षितच राहिले. महाडचा सर्व स्तरावरील विकास जसा रखडला आहे, तसाच या ट्रॉमा केअरचा बळी गेला आहे. महाराष्ट्राच्या आजच्या परिस्थितीत महाडच्या या ट्रॉमा केअर सेंटर आणि स्व. यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाचे भवितव्य मात्र अंधारात आहे हे नक्की.
– महेश शिंदे