अलिबाग : प्रतिनिधी
प्रसिद्ध उद्योगपती अशोक मित्तल यांनी अलिबाग तालुक्यात कोळगाव येथे सीआरझेडचे उल्लंघन करून अनधिकृतपणे बांधलेल्या हॉलिडे रिसॉर्टचे वाढीव बांधकाम शुक्रवार (दि 8)पासून पाडण्यात येणार आहे. अलिबाग प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ यांनी गुरुवारी तेथे जाऊन पाहणी केली. बॉम्बे इन्व्हरमेन्ट अॅक्शन ग्रुप व इतर यांनी अशोक मित्तल यांच्या अनधिकृत बांधकामाबाबत उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. 1 नोव्हेबर 2018 रोजी मुबंई उच्च न्यायालयाने मित्तल यांचे अनधिकृत वाढीव बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. याबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अशोक मित्तल यांना 21 एप्रिल 2019 पूर्वी अनधिकृत बांधकाम स्वतःहून पाडावे अन्यथा प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल अशी नोटीस दिली होती. त्यानुसार मित्तल यांनी
स्वतःहून बांधकाम पाडण्यास सुरुवात केली असली तरी पूर्ण बांधकाम पाडलेले नाही. आता प्रशासनाने दिलेली मुदत संपली असून जिल्हा प्रशासनाकडून हे बांधकाम पाडण्यात येणार आहे. अशोक मित्तल यांनी अलिबाग तालुक्यात कोळगाव येथे 8 फेब्रुवारी 1999 मध्ये पूर्वीच्या मालकाकडून पाच एकर जागा विकत घेतली होती. पूर्वीच्या मालकाला मित्तल यांना जागा विकण्याआधी या पाच एकर जागेत 514 स्के.मी. बांधकाम, एक पाण्याची टाकी व पाच मीटरपेक्षा जास्त उंच नसलेली भिंत बांधण्याची परवानगी रायगड जिल्हाधिकारी यांनी 4 डिसेंबर 1998 रोजी दिली होती. त्यानंतर त्या मालकाने ही जागा अशोक मित्तल याना विकली होती. मात्र जिल्हाधिकारी यांनी आधीच्या मालकाला दिलेल्या बांधकाम परवानगीपेक्षा अशोक मित्तल यांनी जिल्हाधिकारी यांची वाढीव बांधकामाबाबत परवानगी न घेता 1407 स्के.मी.चे अनधिकृत वाढीव बांधकाम केले आहे. दरम्यान, या अनधिकृत वाढीव बांधकामाबाबत मित्तल यांनी जिल्हाधिकारी व कोकण आयुक्त यांच्याकडे परवानगी मिळण्याबाबत अर्ज केला होता. मात्र जिल्हाधिकारी व कोकण आयुक्त यांनी हा अर्ज फेटाळला होता. उच्च न्यायालयाने अनधिकृत वाढीव बांधकाम पाडण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. या निकालाबाबत मित्तल यांची पत्नी निरुपम अशोक मित्तल यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. मात्र
सर्वोच्च न्यायालयाने मित्तल यांचे अपील फेटाळले. त्यामुळे हे बांधकाम पाडण्यात येणार आहे. अलिबाग तालुक्यातील किहीम येथील डायमंड किंग निरव मोदी, धोकवडेमधील कुंदनमल तर मांडवा येथील कोठारी या मोठ्या उद्योगपतींचे बंगले सीआरझेडचे उल्लंघन केल्याबाबत जिल्हा प्रशासनाने जमीनदोस्त केले आहेत. तर आता अशोक मित्तल यांचाही राजेशाही हॉलिडे रिसॉर्ट जमीनदोस्त होणार आहे. तर सीआरझेडचे उल्लंघन करून अनधिकृत बांधकाम करणार्या 580 जणांना पाठविलेल्या नोटीसीमुळे त्यांच्यावरही प्रशासनाची कारवाईची टांगती तलवार लटकलेली आहे.