शहरी असोत वा ग्रामीण आजच्या तरुण पिढीचा अशा संबंधांविषयीचा दृष्टिकोन आधीच्या पिढ्यांपेक्षा बराच वेगळा आहे. समाजमाध्यमांमुळे नात्यात वा संबंधांमध्ये प्रगल्भता येण्याआधीच त्यांचे प्रदर्शन अधिक केले जाते. वितुष्ट येताच मग अहंकार दुखावला जातो. ही कारणे देखील या वाढत्या हत्याप्रकरणांमागे आहेत. वर्तमानपत्रांतून नियमितपणे डोकावणार्या गुन्हेगारीविषयीच्या बातम्या कैकदा आपल्याला भिवया उंचावायला भाग पाडतात. आणि हे बहुदा तेव्हाच होते जेव्हा गुन्ह्यात सहभाग असलेल्या व्यक्ती या सराईत गुन्हेगार नव्हे तर तुमच्या-आमच्यासारखीच सुसंस्कृत किंबहुना किमानपक्षी सरळमार्गी सामान्य जिणे जगणारी असतात. अशा व्यक्तींचा गुन्ह्यांतील विशेषत: हत्या प्रकरणांतील सहभाग आपल्याला सर्वाधिक अचंबित करून जातो. एखाद्याला संपवण्यातून परिस्थितीतील पेचावर तोडगा काढावासा कसा काय वाटू शकतो कुणा सभ्य, सुसंस्कृत माणसाला? पण अशी अनेक प्रकरणे जगभरात कायमच दिसत आली आहेत. आणि तूर्तास निव्वळ भारतातच नव्हे तर जगभरातच हत्या प्रकरणांची संख्या कमी होत चाललेली असताना, आश्चर्यकारकरित्या प्रेमप्रकरणांतून होणार्या हत्यांचे प्रमाण मात्र वाढते आहे. सेंट्रल क्राइम रिपोर्ट ब्युरोने वितरित केलेल्या ताज्या माहितीनुसार 2001 ते 2017 दरम्यान हत्या प्रकरणांच्या मुळाशी प्रेम प्रकरण असण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. 2001 मध्ये देशभरातून 36 हजार 202 खुनांची नोंद झाली. परंतु 2017 पर्यंत ही संख्या तब्बल 21 टक्क्यांनी खाली आली असून त्या वर्षी 27 हजार 653 हत्या प्रकरणांची नोंद झाली आहे. याच काळात वैयक्तिक सुडाच्या भावनेतून केल्या गेलेल्या हत्यांचे प्रमाण 4.3 टक्क्यांनी घसरले तर मालमत्तेच्या वादातून होणार्या हत्यांची संख्याही 12 टक्क्यांनी कमी झाली. मात्र त्याचवेळेला, प्रेमप्रकरणांतून झालेल्या हत्यांची संख्या मात्र 28 टक्क्यांनी वाढली. यात अनैतिक संबंधांशी निगडित प्रकरणांचाही समावेश आहे. राज्य पातळीवर पाहायचे झाले तर आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि पंजाब या राज्यांमध्ये हत्या प्रकरणांमागील मुख्य हेतू म्हणून याचे प्रमाण सर्वाधिक होते. तर दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशात या हेतूने झालेल्या हत्यांचे प्रमाण दुसर्या क्रमांकावर आहे. केरळ आणि पश्चिम बंगाल वगळता उर्वरित सर्व मोठ्या राज्यांमध्ये प्रेम प्रकरणांतून झालेल्या हत्यांचे प्रमाण तिसर्या क्रमांकावर आहे. केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये मात्र अशा हत्या प्रकरणांची संख्या बरीच कमी असल्याने त्यांचे प्रमाण पाचव्या क्रमांकावर होते. अशा हत्या प्रकरणांमध्ये बर्याचदा प्रेम त्रिकोण किंवा अनैतिक संबंध आढळून येतात. कुटुंबियांचा विरोध हेही कारण आढळते. परंतु त्यातून केल्या जाणार्या हत्यांची संख्या बरीच कमी आहे. 2017 मध्ये अशा हत्यांची संख्या 92 होती तर 2016 मध्ये या कारणातून 71 जणांना जीव गमवावा लागल्याचे दिसते. एकीकडे शिक्षणाचा वाढता प्रसार व शहरीकरणामुळे तरुण-तरुणींचा एकमेकांशी येणारा संपर्क वाढला असून त्यातून त्यांच्यात जवळीक निर्माण होण्याचे प्रमाणही वाढले आहे. भिन्न जातिधर्माच्या तरुण-तरुणींमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्यास त्यांना सामाजिक वा कौटुंबिक रोषाला तोंड द्यावे लागते. नकार पचविण्याची पुरुषांची क्षमता बरीच कमी असणे हेही एक कारण हिंसक वर्तनामागे असू शकते. वर्षानुवर्षे प्रामुख्याने हिंदी चित्रपटांतून प्रेम भावनेचे उदात्तीकरण केले गेले आहे. वाढत्या चंगळवादी जिण्यात प्रेम प्रकरणांचा पोत बराच बदलला आहे.
Check Also
शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …