पनवेल : बातमीदार
वाहतुकीचे नियम मोडणार्या वाहनचालकांना चाप लावण्यासाठी राज्यात वाहतूक विभागाला देण्यात आलेल्या ‘इंटरसेप्टर’ वाहनाचे उद्घाटन ठिकठिकाणी पार पडले, मात्र नवी मुंबईतील अशा दोन ‘इंटरसेप्टर’ वाहनांमधील प्रणाली अद्याप कार्यरत झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या नियमभंग करणार्यांवर ‘ऑफलाइन’ कारवाई केली जात आहे. प्रणाली पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर ‘ई-चलान’ पाठविण्यात येणार आहे.
राज्यात महामार्गावर होणारे अपघात हे अचानक वाहन मार्गिका बदलत असताना, तसेच वेगावर नियंत्रण ठेवता न आल्याने होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय मद्य प्राशन करून वाहन चालवणे, क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणे इत्यादी कारणांमुळे अपघात होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. या सार्या प्रकारांना आळा घालण्यासाठी वेळोवेळी उपायोजना करण्यात येतात, याच अनुषंगाने वाहतूक पोलिसांना अत्याधुनिक वाहने (इंटरसेप्टर) पुरविण्यात आली आहेत. वाहनात स्पीड गन, ब्रेथ अॅनालायझर यंत्रणा बसविण्यात आली आहे. या वाहनांचे ‘सर्व्हर’ पुण्यात ठेवण्यात आला आहे. बेशिस्त वाहनचालकांची माहिती आधी पुण्यात ऑनलाइन पाठविण्यात येते, मात्र ही प्रणाली दोन दिवस उलटूनही अद्याप कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे सिद्धता नसताना पोलिसांनी वाहनाचे उद्घाटन आटोपण्याचा निर्णय का घेतला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या दोन दिवसांत नवी मुंबईत सुमारे 85, तर मुंबई-पुणे महामार्गावर 135 बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचा डाटा मुख्य ‘सर्व्हर’वर टाकण्यात आला असला, तरी अद्याप एकाही वाहनचालकाला ई-चलान पाठविण्यात आलेले नाही, मात्र बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
पुणे येथील प्रणाली अद्याप कार्यान्वित झालेली नाही, मात्र केलेल्या कारवायात वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई होणारच आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत ही प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित होईल. त्यानंतर कारवाई निरंतर होत राहील. जेणेकरून अपघातांना आळा बसेल.
-सुनील लोखंडे, उपायुक्त वाहतूक विभाग, नवी मुंबई