मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील भाजप आणि शिवसेना यांच्या युतीबाबतचा निर्णय लवकरच घोषित करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते सोमवारी (दि. 23) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी त्यांनी केंद्र सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांचे विशेषत: कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याच्या निर्णयाचे स्वागत व कौतुक केले.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, तुमच्याप्रमाणे मलाही युतीची चिंता असून, योग्य वेळी योग्य निर्णय घोषित करू, तसेच नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशावरही लवकरच निर्णय घेतला जाईल.
राष्ट्रवाद हा आमचा एकमेव अजेंडा नसून अजेंड्याचा एक भाग आहे. 370 हा जम्मू- काश्मीर नाही, तर राष्ट्रीय एकात्मतेचा मुद्दा असून 370 आणि राष्ट्रवाद आमचा अजेंडा असल्याचा अभिमान आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
कॉर्पोरेट टॅक्स 22 टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचा निर्णय खूप धाडसी असल्याचे सांगून या निर्णयाचा महाराष्ट्राला फायदा होणार असून, गुंतवणूक वाढण्यास मदत मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. बँकांच्या विलीनीकरणाच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचेही त्यांनी स्वागत केले, तसेच 45 लाखांच्या गृहकर्जावर सूट देण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे त्यांनी म्हटले.
भाजपच्या मुंबईतील नरिमन पॉइंट येथील प्रदेश कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेस राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, प्रवक्ते माधव भंडारी आदी नेतेही उपस्थित होते.