Breaking News

टाटा स्टील बीएसएलची सामाजिक बांधिलकी; स्थानिक प्रशासनाला वैद्यकीय उपकरणांची भेट

पनवेल ः रामप्रहर वृत्त

टाटा स्टील बीएसएलचे खोपोली (रायगड) युनिट सध्याच्या कोविडविरोधातील लढाईत योगदान देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या कोविड रुग्णांवरील उपचारासाठी वापरण्यात येणार्‍या पाच बायपॅप मशिन्स नुकत्याच टाटा स्टील बीएसएलच्या खोपोली प्लांटचे कार्यकारी प्रमुख कपिल मोदी यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी व दंडाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे त्यांच्या कार्यालयात सुपूर्द केल्या. महामारीच्या काळात समाजाला मदत पुरवण्याचे आपले प्रयत्न कायम राखत देशातील आघाडीची स्टील कंपनी म्हणून नावाजल्या जाणार्‍या टाटा स्टील बीएसएलने लोकांच्या गरजा ओळखून सामाजिक बांधिलकी जपली आहे. विभागाच्या गरजा ओळखून त्या दृष्टीने टाटा स्टील बीएसएलने आपला बंद असलेला क्रायोजेनिक प्लांट पुन्हा सुरू केला आहे. या प्लांटमधून स्थानिक रुग्णालयांना वैद्यकीय श्रेणीच्या ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ खोपोलीमधील एक सदस्य कंपनी या नात्याने टाटा स्टील बीएसएलने खालापूर सार्वजनिक आरोग्य केंद्र, वावोशी सार्वजनिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय चौक यांना वैद्यकीय उपकरणेही मदत स्वरूपात दिली आहेत. खोपोली येथील कोविड रुग्णालयाच्या संचालनात्मक खर्चासाठी कंपनीने तीन लाख रुपयांचे योगदान दिले आहे. टाटा स्टील बीएसएलने तब्बल एक हजारांपेक्षा जास्त कुटुंबांना अन्नधान्य पुरवले आहे. स्थानिक रुग्णालयांना पीपीई किट्स, आशा कर्मचारी, एएनएम व वैद्यकीय कर्मचार्‍यांना मास्क अशी अत्यावश्यक मदतही कंपनी पुरवत आहे. तसेच स्वयंसहायता गटांच्या महिला सदस्यांना मास्क बनवण्याचे प्रशिक्षण देऊन रोजगाराचा अजून एक मार्ग टाटा स्टील बीएसएलने खुला करून दिला. त्याबरोबरीनेच स्वयंसहायता गटाच्या सदस्यांमार्फत जनजागृतीचे कामही टाटा स्टील बीएसएल करीत आहे.  कोविडचा संसर्ग व प्रसार टाळण्यासाठी कोणकोणती काळजी घेतली पाहिजे याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम कंपनी करीत आहे. लवकरच टाटा स्टील बीएसएलकडून सरकारला एकूण 15 बायपॅप मशिन्स पुरविल्या जाणार आहेत.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply