खालापूर ़: प्रतिनिधी
कायद्याने बालकांनाही या देशाचा सक्षम नागरिक म्हणून विविध अधिकार बहाल केलेले आहेत. पोलीस हा बालकांचा दुसरा पालक असून आपल्यावर कोणताही अन्याय होत असेल तर आमची जरूर मदत घ्या, असे आवाहन खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील यांनी केले.
संयुक्त राष्ट्रसंघाने 20 नोव्हेंबर 1989 रोजी बालहक्क संहिता स्वीकारली व त्याच्यावर 190 देशांनी स्वाक्षरी करून आपल्या देशांमध्ये बालहक्क मंजूर केले आहेत. यावर्षी यास 30 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त राज्यात बालकांचे हक्क व सुरक्षा याबाबत जाणीव जागृती होण्याकरिता 14 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत बालसुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहानिमित्ताने शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग, पोलीस विभाग आणि युनिसेफ यांच्याद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. बाल सुरक्षा सप्ताह अंतर्गत दिनांक 14 ते 20 नोव्हेंबर या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सहजसेवा फाउंडेशन आणि खोपोली पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जनता विद्यालयात मंगळवारी (दि. 19) दुपारच्या सत्रात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अन्यायाला घाबरू नका, जरूर लागली तर आमची मदत घ्या, असे विद्यार्थ्यांना सांगितले.
खोपोलीचे पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर, सहजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे यांनीही यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सहजसेवा फाउंडेशनचे खजिनदार संतोष गायकर, जनता विद्यालयाचे उपमुख्याध्यापक पाटील, टेक्निकल विभागाचे प्रमुख गायकवाड, जयश्री कुलकर्णी, किरण जयस्वाल, तेजश्री पाठाडे, सलमान शेख, पोलीस कर्मचारी कृष्णकांत गडदे आदी उपस्थित होते. शालेय कमिटी अध्यक्ष दिनेश गुरव व मुख्याधिपिका रिठे मॅडम यांचे या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले.