अलिबाग : प्रतिनिधी
सागरी सुरक्षा यंत्रणा किती सक्षम आहे हे तपासण्यासाठी रायगड पोलीस दलाकडून सागर कवच अभियान राबविण्यात येत असते. त्यानुसार 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी हे अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी सागरी किनारी भागात ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे. मुंबईत 1992मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरडीएक्स हे रायगड जिल्ह्यातील शेखाडीमार्गे नेण्यात आले होते. 2011 साली मुंबईवर हल्ला करणारे दहशतवादी समुद्रमार्गेच आले होते. या पार्श्वभूमीवर सागरी सुरक्षेवर जास्त लक्ष दिले जाते. सहा महिन्यांनी जिल्हा पोलीस दलाकडून सागरी कवच अभियान राबविण्यात येते. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने राबविलेल्या अभियानासाठी पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, आठ उपविभागीय पोलीस अधिकारी, 15 पोलीस निरीक्षक, 49 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 577 पोलीस कर्मचारी, 350 सागरी सुरक्षा दल सदस्य तैनात करण्यात आले आहेत.
रेवदंडा पोलिसांची नाकाबंदी
रेवदंडा : प्रतिनिधी
सागरी सुरक्षा कवच अभियानांतर्गत रेवदंडा पोलिसांनी निरीक्षक सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (दि. 20) ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी तसेच टेहळणीचे काम केले. रेवदंडा पोलिसांतर्फे 20 व 21 नोव्हेंबर रोजी सागरी सुरक्षा कवच अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत बुधवारी रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीतील संवेदनशील व गर्दीच्या ठिकाणी तपासणी व टेहळणी केली. यामध्ये रेवदंडा पारनाका, चौलनाका, वावेनाका, साळाव चेकपोस्ट, बोर्लीनाका, साळाव बिर्ला मंदिर आदी ठिकाणांसह रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समुद्र किनार्यावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच लहान मोठ्या वाहनांची तपासणी केली जात होती. साळाव चेकपोस्ट तसेच ठिकठिकाणी वाहने तपासणी करून पोलीस वाहनचालकांचे परवाने तपासत होते. साळाव चेकपोस्ट येथे पर्यटक तसेच खासगी लोक यांची तपासणी केली जात होती. या वेळी विना लायसन्स मोटरसायकल चालविणार्यांची फारच भंबेरी उडाली.
सागरी सुरक्षा कवच अभियानांतर्गत वाहनांची तपासणी व नाकाबंदीसाठी रेवदंडा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचार्यांसह आठ पोलीस अधिकारी व 70 पोलीस कर्मचारी मागविण्यात आले होते.
-सुनील जैतापूरकर, निरीक्षक, रेवदंडा पोलीस ठाणे