सुधागड तालुक्यात माती, कुड व बांबूची घरे सजली
पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यात नैसर्गिक संसाधने वापरून बनविलेल्या आकर्षक व आरामदायी घरांचा वापर आता कृषी व इको टुरिझमसाठी मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा प्रकारे घरे बांधणार्या करागिरांची मागणीदेखील वाढली आहे. शहरातील अनेक लोक अशा घरांमध्ये राहण्यास पसंती देत आहेत.
मागील महिन्यात सुधागड तालुक्यातील इको आर्किटेक्ट तुषार केळकर यांनी भेरव येथे एका इकोटुरिझम उपक्रमासाठी मातीची, कुडाची, बांबू व लाकडाची अशा विविध प्रकारची घरे बनवली आहेत. या आधी कोलाड येथे एका कृषी पर्यटन केंद्रमध्येदेखील बांबू व कुडाची घरे बनवली आहेत. या माध्यमातून ग्रामीण जीवनशैली, आरोग्यपूर्ण व निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा अनुभव शहरातील लोक घेत आहेत. शिवाय यातून कृषी व इकोटुरिझमला चालनादेखील मिळत आहे. याशिवाय अनेक फार्महाऊसवालेदेखील आपल्या शेतात अशा प्रकारची घरे बांधण्यास पसंती देत आहेत. सुधागड तालुक्यात विविध ठिकाणी अशी घरे बांधलेली दिसतात.
कुडाचे घर बांधण्यासाठी सर्वात महत्वाची साधनसामुग्री म्हणजे कारवीच्या काठ्या आणि माती. जंगलातून कारवीच्या लांब काठ्या तोडून आणल्या जातात. मग दगडी व मातीच्या पायावर कारवीच्या काठ्या उभ्या करुन बांधल्या जातात. त्यावर मातीचा आणि शेणाचा मुलामा दिला जातो. या कामासाठी कुशल हातांची व अनुभवाची गरज असते. नैसर्गिक संसाधने वापरून घर तयार केल्यानंतर चुन्याच्या सहाय्याने वारली चित्रकला किंवा नक्षीकाम करून ते अधिक आकर्षक बनविले जाते.
पूर्णतः आरामदायी व नैसर्गिक
कारवीच्या काठ्यांना माती व शेण थापून तयार केलेल्या भिंती, तसेच कौलारू छप्पर असलेल्या घरात थंडावा राहतो. उन्हाळ्यात तर ही घरे वरदानच ठरतात. शिवाय आकर्षकदेखील दिसतात. प्रदूषण विरहित वातावरणात या घरांमध्ये राहण्याचा आंनद अनेकजण लुटतात.
कुडाच्या, माती व बांबूच्या घरांना इकोटुरिझम व कृषी पर्यटनासाठी खूप अधिक मागणी आहे. शिवाय नैसर्गिक संसाधनांचा वापर होत असल्याने खर्चदेखील कमी येतो. मात्र अशी घरे बांधणारे कारागीर येथे कमी आहेत. अनेकांना याचे प्रशिक्षण देतो.
-तुषार केळकर, इको आर्किटेक्ट, उद्धर, ता. सुधागड