पनवेल : बातमीदार
तळोजा परिसरातील कोलवाडी, वलप, पाले बुद्रुक, चिंध्रण, वावंजे, खेरणे, हेदुटणे आदिवासी वाडी ही गावे पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात, मात्र या ठिकाणी जाणे अनेकांसाठी गैरसोयीचे ठरत आहे. ही गावे जवळच्या पोलीस ठाण्याला जोडण्यात यावीत, असा प्रस्ताव पनवेल तालुका भाजपने राज्य शासनाला दिला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री कार्यालयाने हा प्रस्ताव गृहसचिवांकडे पाठवला आहे.
पनवेल तालुका पोलीस ठाणे यांचे कार्यक्षेत्र खूप मोठे आहे. शहरी भागाबरोबरच पनवेल तालुक्यातील 100 पेक्षा अधिक गावे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात. या सर्व ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था पाहताना पोलीस कर्मचारी आणि अधिकार्यांवर ताण येतो, तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठीसुद्धा गैरसोयीचे आहे. विशेष म्हणजे, तळोजा परिसरातील कोलवाडी, वलप, पाले बुद्रुक, चिंध्रण, वावंजे, खेरणे, हेदुटणे आदीवासी वाडी या गावातील नागरिकांना बाजूलाच तळोजा पोलीस स्टेशन असून पनवेलला जावे लागत असल्याने त्रास होतो. पनवेल तालुका पोलीस ठाण्यात जाण्याकरिता किमान 15 किमी अंतर पार करावे लागते. मोठ्या प्रमाणात वेळ, पैसा वाया जातो. एखादी तक्रार करायची तर थेट तालुका पोलीस ठाण्यात जावे लागते, तसेच गावात काही भांडण-तंटा झाला, चोरीदरोड्याचे गुन्हे घडले, तर तालुका पोलिसांना वेळेत येथे पोहोचता येत नाही. पासपोर्टसह इतर कामांकरिता तालुका पोलीस स्टेशनला जावे लागते. बाजूला तळोजा पोलीस स्टेशन असले, तरी नागरिकांना पनवेलला जावे लागत असल्याने त्रास होतो. यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी आणि कळंबोली शहर उपाध्यक्ष प्रशांत रणवरे यांनी शासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू केला. मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव अजोय मेहता यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन हा प्रस्ताव गृहविभागाचे सचिव संजयकुमार यांच्याकडे पाठवला आहे. त्याचबरोबर प्रशांत रणवरे यांनी परिमंडळ-2चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे, सहायक आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्यासह स्थानिक पोलीस स्टेशनला पत्र दिले आहे.