Breaking News

वार्षिक योजनेचा निधी 100 टक्के खर्चाबाबत कार्यवाही करा

जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश

अलिबाग : प्रतिनिधी

जिल्हा वार्षिक योजनेतील वर्ष 2019-20च्या कामांच्या तांत्रिक मान्यता प्रस्ताव 30 नोव्हेंबरपूर्वी तसेच प्रशासकीय मान्यता संबंधित सर्व यंत्रणांनी तत्काळ घ्याव्यात. जेथे निविदा काढायच्या असतील, त्यांची प्रक्रिया पूर्ण करून या योजनेतील कामे वेळेत सुरू करा. ज्या विभागांचा निधी अखर्चित राहणार असेल त्यांनी निधी तातडीने शासनजमा करण्याचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी (दि. 20) विविध विभागांच्या अधिकार्‍यांना दिले.

 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात  जिल्हा वार्षिक योजना, विविध यंत्रणांच्या खर्चाचा आढावा घेण्यासाठी बुधवारी बैठक घेण्यात आली. त्या वेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. निधी वेळेत खर्च होईल या दृष्टीने सर्व यंत्रणांनी नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी या वेळी दिल्या.

पाऊस, निवडणूक यामुळे आर्थिक वर्षात निधी खर्च होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. लोककल्याणाच्या योजनांच्या अनुषंगाने यंत्रणांना प्राप्त झालेला निधी त्यांनी वेळेत खर्च करणे आवश्यक आहे.  सर्व विभागांनी प्रस्ताव 30 नोव्हेंबरपर्यंत सादर करावेत. त्यासाठी आवश्यक प्रक्रिया पार पाडावी. आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, रस्ते विकास, समाजकल्याण या विभागांनी त्यांची कामे वेळेत मार्गी लागण्यासाठी योग्य नियोजन करावे, असे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.

या वेळी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) वर्ष 2019-20साठी शासनाने मंजूर केलेल्या निधीच्या खर्चाचा आढावा जिल्हाधिकार्‍यांनी घेतला, तसेच सन 2020-21च्या प्रस्तावित आराखड्यावर चर्चा करण्यात आली. ज्या विभागांना निधी मंजूर झाला आहे, मात्र संबंधित विभागाकडून अद्याप कुठल्याही प्रकारचे मान्यतेचे प्रस्ताव सादर केलेले नाही त्या सर्व विभागांनी तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची  कार्यवाही वेळेत पूर्ण करावी. अखर्चित असलेला निधी तातडीने  नियोजन समितीकडे समर्पित करणारे प्रस्ताव सादर करावेत, जेणेकरून ज्या यंत्रणांना निधीची आवश्यकता असेल, त्यांना तो निधी देण्यात येईल, असेही जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, प्रकल्प अधिकारी श्रीमती अहिरराव, डीएफओ मनीष कुमार, राकेश सफट, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शेळके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी या आढावा बैठकीला उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply