कर्जत : बातमीदार
तालुक्यातील सुतारपाडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवर काही दिवसांपूर्वी झाड कोसळल्याने या शाळा इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. अनेक दिवस उलटूनही या इमारतीची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यांनी बसायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या विद्यार्थ्यांना शाळेच्या व्हरांड्यात बसावे लागत आहे, मात्र याकडे ग्रामपंचायतीसह शाळा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. कर्जत तालुक्यातील ओलमन गु्रप ग्रामपंचायत हद्दीमधील सुतारपाडा येथे जिल्हा परिषदेची पाचवीपर्यंतची शाळा आहे. 50हून अधिक विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. काही दिवसांपूर्वी आलेल्या सोसाट्याच्या वार्यात या शाळेच्या मागे असलेले झाड शाळेच्या इमारतीवर कोसळले होते. यामुळे शाळेच्या इमारतीचे पत्रे फुटून आणि भिंतीला तडे गेल्याने प्रचंड नुकसान झाले. या घटनेला अनेक दिवस उलटूनही इमारतीची दुरुस्ती करण्यात आली नाही. मुख्याध्यापक यशवंत निरगुडे व ग्रामस्थांनी पाहणी करून नुकसान झालेल्या शाळा इमारतीचा पंचनामा केला, मात्र दुरुस्ती झाली नाही. ग्रामपंचायत प्रशासन व शिक्षण विभागानेही याकडे दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. याकडे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप पालकांनी केला आहे. दरम्यान, लवकरात लवकर सुतारपाडा येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
वादळात झाड कोसल्याने सुतारपाडा येथील शाळा इमारतीची दुरवस्था झाली आहे. त्याबद्दल शाळा प्रशासन व शिक्षण विभागाला अनेक वेळा कळवूनही शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करण्यात आली नाही. प्रशासनाने लवकरात लवकर शाळेची दुरुस्ती करावी.
-राकेश खडेकर, पालक, सुतारपाडा, ता. कर्जत
सुतारपाडा शाळा इमारत दुरुस्तीसंदर्भात पंचायत समितीकडे आणि इंजिनिअरकडे प्रस्ताव सादर केला आहे, मात्र तलाठ्यांनी केलेला पंचनामा सादर न केल्याने दुरुस्ती रखडली आहे. लवकरच दुरुस्ती करण्यात येईल.
-संदीप चाकड, शिक्षक, जि. प. शाळा सुतारपाडा, ता. कर्जत