Breaking News

उरण किनारपट्टी ठरतेय तस्करीचे केंद्र

उरण : रामप्रहर वृत्त

पोलीस आयुक्तालय, तसेच किनारपट्टी क्षेत्रामध्ये विशेषतः जेएनपीटीजवळचा परिसर तस्करीचे केंद्रस्थान ठरू लागला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने तब्बल 130 किलो हेरॉइन या परिसरातून जप्त केल्यामुळे खळबळ उडाली आहे. यापूर्वीही परिसरात रक्तचंदन व सोने तस्करीचे प्रकार निदर्शनास आले असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्येही अमली पदार्थांची तस्करी वाढू लागली आहे. महाविद्यालयीन तरुणही अमली पदार्थांच्या आहारी जाऊ लागले आहेत. शहरातील उद्याने, मोकळ्या इमारतीमध्ये नशा करत असलेले तरुण बसलेले दृश्य दिसू लागले आहे. आयुक्तालय क्षेत्रामध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होत असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून पाहावयास मिळत होते; परंतुु आता एमडी पावडर, कोकेन, हेरॉइन या अमली पदार्थांचा वापर होऊ लागला आहे.

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने या परिसरातून तब्बल 130 किलो अफगाण हेरॉइन जप्त केले असून, बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत जवळपास 1300 कोटी असल्याचे बोलले जात आहे. या कारवाईमुळे या परिसरातील तस्करीचे रॅकेट किती मोठ्या प्रमाणात आहे हे उघड झाले आहे. आतापर्यंत जेएनपीटीच्या परिसरामध्ये रक्तचंदन व सोने तस्करी मोठ्या प्रमाणात होऊ लागली होती. रक्तचंदनाचा मोठा साठा या परिसरातून नवी मुंबई पोलीस व सीमाशुल्क विभागानेही हस्तगत केला आहे. अनेक टोळ्या जेरबंद केल्या आहेत. एका वर्षामध्ये सोने तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्या असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. सोने तस्करीचे प्रकार सीमाशुल्क विभागाने व इतर तपास यंत्रणांनी उघडकीस आणले आहेत.

आयुक्तालय परिसरातील प्रमुख तस्करीच्या घटना

– 2011 – जेएनपीटीजवळ सीमाशुल्क विभागाच्या पथकाने धाड टाकून दोन कोटी नऊ लाख रुपयांचे रक्तचंदन जप्त केले.

– ऑगस्ट 2013 – उरण रोडवर दोन कंटेनरवर छापा टाकून साडेआठ कोटी रुपये किमतीचे 42 टन रक्तचंदन जप्त केले.

– मार्च 2015 – मुंबई-गोवा महामार्गावर कल्ले गावाजवळ कंटेनरमध्ये 41 लाख 60 हजार रुपये किमतीचे रक्तचंदन जप्त.

– डिसेंबर 2017 – एसीच्या पार्टमधून 50 किलो सोन्यानी बिस्किटे लपवून आणली होती. सीमाशुल्क विभागाने सोने जप्त केले.

– मार्च 2018 – दुबईला पाठविण्यासाठी आणलेले सात टन रक्तचंदन जप्त करण्यात आले.

– एप्रिल 2019 – दुबईवरून आलेल्या भंगारामधून 19 किलो वजनाची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली.

Check Also

‘सामना’ पन्नाशीचा झाला…

काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा …

Leave a Reply