म्हसळा : प्रतिनिधी
क्यार व महा चक्रीवादळ आणि अवेळी पावसामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले. बाधित शेतकर्यांना आर्थिक साहाय्य देण्यासंदर्भात राज्यपालांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत महत्त्वाचा निर्णय झाला आहे. म्हसळा तालुक्यात भातपिकाखालील एकूण क्षेत्र 2689 हेक्टर आहे. त्यापैकी 1755 शेतकर्यांचे 530.02 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यांना 42 लाख 40 हजार रुपये अनुदान मिळणार आहे. त्यापैकी 10 लाख 31 हजार रुपये अनुदानाचे वाटप झाले आहे.
दोन हेक्टरपर्यंत नुकसान झालेल्या आपद्ग्रस्त शेतकर्यांना ही मदत मिळणार आहे. नुकसान झालेल्या शेतकर्यांना महसुलात सूट तसेच त्यांच्या पाल्यांना शाळा, महाविद्यालयीन परीक्षा शुल्कात माफी मिळणार आहे. नुकसानीची रक्कम आपद्ग्रस्त शेतकर्यांच्या थेट बँक खात्यावर जमा होणार आहे. मदतीच्या रकमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये, असे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत.
-शरद गोसावी, तहसीलदार, म्हसळा