Breaking News

कांद्यामुळे डोळ्याला पाणी

भारताच्या कांदा निर्यातबंदीनंतर शेजारी राष्ट्रांनी म्यानमार, इजिप्त, तुर्कस्तान आणि चीन येथून कांदा आयात करण्यास सुरूवात केली आहे. भारत प्रतिवर्षी वीस लाख टनाहून अधिक कांद्याची निर्यात करतो. इतक्या मोठ्या प्रमाणातील कांद्याची टंचाई भरून काढणे शेजारी देशांना अद्यापही शक्य झालेले दिसत नाही. कांद्याच्या चढ्या भावांमुळे देशातील सर्वसामान्यांच्या सहनशक्तीचाही अंत होण्यापूर्वी कांद्याच्या भावांकडे लक्ष द्यावेच लागेल.

वृत्तवाहिन्यांवरून सध्या निव्वळ महाराष्ट्रातील सत्तापेचाच्याच ब्रेकिंग न्यूजचा रतीब घालणे सुरू असले तरी जगात इतरही अनेक सकारात्मक आणि नकारात्मक घटना घडतच आहेत. कांद्याचे चढे भाव ही यातलीच एक घटना जी आपल्या देशातच नव्हे तर शेजारी देशांतही सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी चाट लावते आहे. कांदा हा आशियाई देशांतील सर्वसामान्यांच्या दैनंदिन आहारातील महत्त्वाचा घटक असून महाराष्ट्रातील लासलगाव ही संपूर्ण आशिया खंडातील कांद्याची मोठी बाजारपेठ मानली जाते. येथील घाऊक बाजारात कांद्याची आवक पुन्हा एकदा घटू लागल्यामुळे कांद्याचा भाव वधारत चालला आहे. एरव्ही कांदा चिरताना डोळ्याला येणारे पाणी पुसावे लागते तर सध्या पुन्हा एकदा कांद्याचा निव्वळ भावच ऐकून सर्वसामान्य गृहिणीच्या डोळ्याला पाणी यावे अशी स्थिती आहे. कांद्याच्या किरकोळ बाजारातील दराने शतक ओलांडले असून मुंबई व आसपासच्या परिसरात कित्येक भागांत उत्तम प्रतीचा कांदा हा 120 रुपये प्रति किलो दराने विकला जातो आहे. लासलगावची कांदा बाजारपेठ असो वा मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील घाऊक बाजारपेठ, दोन्हीकडे सध्या अनेक ठिकाणांहून नव्या कांद्याची आवक होते आहे. मात्र तिचे प्रमाण नेहमीइतके नसल्यामुळेच कांद्याचा भाव वधारला आहे असे व्यापारी सांगतात. नेहमीच्या दिवसाला शंभर-सव्वाशे गाड्यांच्या ऐवजी अद्याप जेमतेम निम्म्याच म्हणजे 60 ते 70 गाड्यांचीच आवक होत असल्याने कांद्याचा भाव या महिन्याच्या प्रारंभीपासून सातत्याने वाढतो आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार रविवारी कांद्याचा सरासरी दर मुंबईत 75 रुपये प्रति किलो होता तर पुण्यात तो 78 रुपये प्रति किलो होता. यंदा मान्सूनच्या सुरूवातीला पावसाला विलंब झाल्यामुळे कांद्याची लागवड उशीरा सुरू झाली. आणि पीक हातातोंडाशी आलेले असताना अवकाळी पावसाने शेतेच पाण्याखाली गेली. याचा फटका इतर पिकांसोबतच कांद्यालाही बसला आहे. बाजारात पुरेसा कांदा नसल्याचे लक्षात येताच किरकोळ व्यापारी त्याचा फायदा उठवित असून त्यामुळेच कांद्याचे भाव शंभरच्या पुढे गेले आहेत. उत्तरेकडील राज्यांमध्ये देखील महाराष्ट्रातील कांदा न पोहोचल्याने कांद्याचे भाव वधारले आहेत. या प्रदेशात राजस्थान आणि हरयाणातील कांदा बाजारात पोहोचला आहे. मात्र नेहमी जेथून सर्वाधिक कांद्याची आवक होते त्या महाराष्ट्रातून कांदा येणे बंद असल्यामुळेच त्याचा परिणाम कांद्याच्या किरकोळ बाजारातील दरावर दिसतो आहे. लग्नसमारंभांचा काळ असल्याने कांद्याची मागणीही सध्या वधारलेली आहे त्यामुळे कांद्याचे भाव खाली येण्याची कोणतीही चिन्हे नसल्याचे व्यापारी सांगतात. अवकाळी पावसामुळे भारतात उन्हाळी कांद्याची आवक लांबल्याने सप्टेंबरपासूनच शेजारच्या बांगला देशातही कांद्याचे भाव वधारले आणि अखेर भारत सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्यानंतर तर बांगला देशातील कांद्याचे दर गेल्या सहा वर्षांत कधीच वधारले नव्हते इतके वधारले आहेत.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply