पाच दुचाकी हस्तगत, नऊ गुन्ह्यांची उकल
कर्जत : बातमीदार
कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील दुचाकींची चोरी करणार्या आरोपीला पोलिसांनी सातारा येथून अटक केली आहे. अधिक वृत्त असे, कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दितून दुचाकींची चोरी होत असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर कर्जत पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या मदतीने दुचाकी चोरणार्या तरुणाला सातारा येथून ताब्यात घेतले. त्या तरुणांकडून पोलिसांनी पाच दुचाकीदेखील हस्तगत केल्या आहेत. दरम्यान, कर्जत पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या या गुन्ह्यात पोलीस उपनिरीक्षक महेश कदम आणि यशवंत झेमसे यांनी घटनास्थळाची पाहणी करुन सातारा तेथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. गुप्त बातमीदार यांच्या मार्फत सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील दापवाडी येथील ऋषिकेश रामदास रांजणे (24) याने गुन्ह्याची कबुली दिली. या तरुणाची पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने उलटतपासणी केली असता त्या तरुणाने रायगड, ठाणे, पालघर आणि पुणे जिल्ह्यात दुचाकींच्या चोरून नेल्या आहेत. पोलिसांनी त्या तरुणांकडून पाच दुचाकी ताब्यात घेतल्या असून दुचाकी चोरीचे एकूण 13 गुन्हे आहेत. या सर्व गुन्ह्यांची उकल स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक महेश कदम आणि त्यांच्या सहकार्यांनी केली.
विविध शहरांत गुन्हे दाखल
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील दापवाडी येथील ऋषिकेश रामदास रांजणे या तरुणाने कर्जत पोलीस ठाणे येथे एक तर पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त हद्दीत दोन,पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये सहा, तसेच भोईसर पोलीस ठाणे येथील दोन आणि वाणगाव तसेच नवी मुंबई कोपरखैरणे पोलीस ठाणे येथील एक एक दुचाकी चोरून नेल्या होत्या. या 13 गुन्ह्यांपैकी पोलिसांच्या पथकाने एक लाख 62 हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत. सदर आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे.