Breaking News

कृषी विधेयकांवरून शेतकर्‍यांची दिशाभूल : मोदी

पाटणा : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांवरून विरोधक खोटा प्रचार करीत आहेत, मात्र शेतकर्‍यांनी आपली दिशाभूल होऊ देऊ नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. बिहारमध्ये रेल्वेपुलासह योजनांचे लोकार्पण केल्यानंतर रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदींनी कृषी विधेयकांबद्दल शेतकर्‍याचे अभिनंदन करताना शेतकर्‍यांसाठी हे सुरक्षा कवच असल्याचे सांगितले. देशातील काही लोक जे अनेक दशके सत्तेत होते व ज्यांनी देशावर राज्य केले ते लोक खोटे बोलून शेतकर्‍यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. निवडणुकीदरम्यान शेतकर्‍यांची मते मिळवण्यासाठी ते मोठ्या मोठ्या गोष्टी करीत होते. आपल्या जाहीरनाम्यातही सांगत होते, पण निवडणुकीनंतर सारे काही विसरून जायचे, अशी अप्रत्यक्ष टीका पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर केली.
आज जेव्हा या सर्व गोष्टी भाजप-एनडीए सरकार करीत आहे तेव्हा खोटी माहिती पसरवली जात आहे. ज्या गोष्टींचा विरोध केला जात आहे त्याचाच उल्लेख यांनी जाहीरनाम्यात केला होता, पण एनडीए सरकारने बदल केले आहेत तर आता त्याचा विरोध करीत आहेत. चुकीची माहिती पसरवत आहेत. हे लोक देशातील शेतकरी किती जागरूक आहे हे विसरत आहेत. काही लोकांना मिळणार्‍या नव्या संधी आवडत नसल्याचे तो पाहत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पुढे पंतप्रधान मोदींनी सांगितले की, सरकारकडून शेतकर्‍यांना किमान आधारभूत किंमत दिली जाणार नाही असा खोटा प्रचार केला जात आहे. शेतकर्‍यांचे धान्य खरेदी केले जाणार नाही अशाही खोट्या गोष्टी सांगितल्या जात आहे. हे सर्व खोटे आणि चुकीचे आहे. आमचे सरकार शेतकर्‍यांना एमएसपीच्या माध्यमातून योग्य किंमत देण्यासाठी कटिबद्ध आहे. सरकारकडून होणारी खरेदी आधीप्रमाणे सुरू राहील. कोणतीही व्यक्ती आपले उत्पन्न जगात कुठेही विकू शकतो. शेतकर्‍यांसाठी गेल्या सहा वर्षांत एनडीए सरकारने केले आहे, तेवढे याआधी करण्यात आलेले नाही, असा दावाही त्यांनी या वेळी केला.

Check Also

पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळण्यासाठी कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे मागणी मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त पेण …

Leave a Reply