Breaking News

मुंबईचा आणखी एक विजय

मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेत सूर्यकुमार पुन्हा तळपला

मुंबई : प्रतिनिधी

कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या मुंबई संघाने सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत आपली धडाकेबाज कामगिरी सुरूच ठेवली आहे. सुपर लीग ब गटात मुंबईने कर्नाटकवर सात गडी राखून मात केली. कर्नाटकने विजयासाठी दिलेले 174 धावांचे लक्ष्य मुंबईने सूर्यकुमारच्या नाबाद 94 धावांच्या जोरावर पूर्ण केले.

नाणेफेक जिंकत मुंबईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्नाटकची सुरुवात खराब झाली, शम्स मुलानीच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका खेळण्याच्या नादात यष्टीरक्षक आदित्य तरेने राहुलला यष्टीचीत करत माघारी धाडले. यानंतर कर्णधार मनीष पांडे आणि करुण नायरही स्वस्तात परतले. कर्नाटकचे तीन फलंदाज अवघ्या 19 धावांत बाद झाल्यानंतर देवदत्त पडिक्कल आणि रोहन कदम या फलंदाजांनी फटकेबाजी करीत संघाचा डाव सावरला. पडिक्कल आणि कदम यांनी अर्धशतकी खेळी केली.

पडिक्कल 57 धावांवर माघारी परतल्यानंतर रोहन कदमने किल्ला लढविणे सुरू ठेवले. कदम 71 धावा काढत शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर कर्नाटकच्या तळातल्या फलंदाजांनी संघाला 173 धावांचा टप्पा गाठून दिला. मुंबईकडून शार्दुल ठाकूर आणि शिवम दुबेने प्रत्येकी दोन बळी टिपले, तर शम्स मुलानीने एक गडी बाद केला. याशिवाय कर्नाटकचा एक फलंदाज धावबाद झाला.

प्रत्युत्तरादाखल मुंबईची सुरुवातही फारशी चांगली झाली नाही. पृथ्वी शॉ आणि आदित्य तरे माघारी परतले. यानंतर श्रेयस अय्यरही फारशी चमक दाखवू शकला नाही, मात्र यानंतर सूर्यकुमार यादवने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेत कर्नाटकच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. यादवने नाबाद 94 धावांची खेळी केली. शिवम दुबेने त्याला 22 धावा काढत त्याला मोलाची साथ दिली. कर्नाटककडून रोनित मोरे, प्रवीण दुबे आणि श्रेयस गोपाळ यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply