महाआघाडीच्या नेत्यांना अभिनेत्याचा सवाल
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात बहुमताचा आकडा टिकवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आपले आमदार सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न केले. तिन्ही पक्षांनी आपल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले होते, मात्र आता सत्तास्थापनेनंतर आमदारांच्या हॉटेल्सची बिले शेतकरी भरणार का, असा सवाल अभिनेता सुमीत राघवन याने केला आहे.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेना आमदारांचा मुक्काम हॉटेल रिट्रीटमध्ये होता. हॉटेल रिट्रीटनंतर शिवसेनेच्या आमदारांना हॉटेल ललितमध्ये हलविण्यात आले होते. काँग्रेसने आपले आमदार जुहूच्या जे. डब्लू. मॅरिएटमध्ये ठेवले होते, तर राष्ट्रवादीने आपल्या आमदारांना ठेवण्याची व्यवस्था पवई येथील रेनेसन्स हॉटेलात केली होती.
सुमीत यावर ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त झाला. ट्रायडंट, रेनेसन्स, ललित, हयात, मॅरिएट या हॉटेल्सनी त्यांच्या मेनूकार्डमधून ‘खिचडी’ हा पदार्थ वगळावा, पण आता या हॉटेल्सची बिले कोण भरणार? बहुधा शेतकरी, असा उपरोधिक टोलाही सुमीतने लगावला.