Breaking News

मराठी माणूस, त्याची भाषा आणि इतर लोक

महाराष्ट्रातील सर्व भाषिक शाळांमधून मराठी भाषा आणि साहित्य हा विषय अनिवार्य करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या मुंबईत चालू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात घोषित केला. महाराष्ट्राबाहेरील आणि महाराष्ट्र शासनाचे ज्यांच्या प्रशासनावर नियंत्रण नाही अशा शिक्षण संस्थांच्या शाळा महाराष्ट्रात त्यांच्या विशिष्ट विद्यार्थीवर्गासाठी विद्यादानाचे काम करीत असतात. तेथेही हा अनिवार्यतेचा नियम लागू होईल. थोडक्यात येथून पुढे महाराष्ट्रात ज्याने शालेय जीवन व्यतीत केले त्याला मराठीत बोलता, वाचता आणि लिहिता येईल. एकसंध आणि एकात्म महाराष्ट्र होण्याच्या दृष्टीने हे पुढचे पाऊल असेल.

भाषिक प्रांतरचनेच्या धोरणानुसार 1960मध्ये आकारास आलेल्या महाराष्ट्राची पुढील वर्षी षष्ट्यब्दी आहे. यानिमित्ताने अंतर्मुख होऊन मराठी माणसाने प्रामाणिकपणे चिंतन केले तर त्याच्या हे लक्षात येईल की जे महाराष्ट्रात राहतात त्यांना दैनंदिन व्यवहारापुरते तरी मराठीत संभाषण करता आले पाहिजे, असा आग्रह मराठी माणसानेच धरलेला नाही. त्यामुळे मराठी भाषेची सर्व स्तरांवर पुष्कळ उपेक्षा आणि मानहानीही झाली आहे. मराठी माणूस घराबाहेर पडला की रिक्षाचालक, भाजीविक्रेता येथपासून तो संस्थाधिकार्‍यांपर्यंत कोणाशीही मराठीत बोलणे शिष्टाचाराला सोडून आहे असे मानतो. त्यामुळे अन्य भाषिकांच्या कानावर मराठी शब्द पडायला पाहिजेत तेव्हढे पडत नाहीत. तरीसुद्धा अनेक अमराठी भाषिकांनी मराठीत चांगली प्रगती केल्याचे पाहायला मिळते. अर्थात याचे श्रेय त्यांच्या चौकसपणाला आहे. ते श्रेय मराठी माणसाचे नाही. कारण तो मराठी भाषेच्या भवितव्याविषयी पूर्णपणे उदासीन आहे.

भाषेची जवळीक तिच्या व्यावहारिक उपयुक्तेततून उत्पन्न होते, तशी तिच्या इतिहासाच्या  अभिमानातूनही निर्माण होते. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचे आंदोलन चालू असताना समितीचे नेते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे प्रत्येक भाषणातून सांगत असत की, इतर प्रांतांना भूगोल आहे, तर महाराष्ट्राला भूगोल आहे तसा इतिहासही आहे. तो इतिहास शिवाजीचा आहे, पण शिवाजी जसा आहे तसा सांगितला तर तो मुसलमानांना आवडेल की नाही या भीतीने आपण शिवाजी सांगण्याचे सोडून दिले. मतांच्या राजकारणाने महाराष्ट्राच्या मूलमंत्रास मागे ढकलले. त्यामुळे राजकीय व्यवहारात मराठी भाषेला प्रतिष्ठित आणि अधिकृत स्थान देणे आणि त्यादृष्टीने भाषाशुद्धी करणे हा महाराजांच्या सर्वंकष क्रांतीचा महत्त्वाचा भाग आहे हे आमच्या स्मृतिकोशातून लुप्त झाले. 1920नंतर राष्ट्रवादाच्या ज्या भ्रांत संकल्पना आपल्याकडे प्रसृत झाल्या त्यांचा परिणाम भारतीय भाषांच्या प्रगतीवरही होऊ शकला असता. शिवाजी महाराजांनी फार्सीला हटवून त्याजागी मराठीला स्थानापन्न केले हे राजवाड्यांनी लक्षात आणून दिले, पण पोहचायला पाहिजे तेवढे आमच्यापर्यंत पोहचले नाही. शिवाजी महाराजांमुळे आज उत्तरेकडच्या सर्व भारतीय भाषा जिवंत राहिल्या आहेत आणि हे त्यांचे ऋण तेथील लोक कृतज्ञतापूर्वक मान्य करतात. मराठ्यांच्या भीमथडीची तट्टे जेथपर्यंत पोहचली तो भाग हिंदुस्थान म्हणून राहिला. बाकीचा पाकिस्तान झाला, असे इतिहासकार शेजवलकर यांनी म्हटले. याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्य स्थापण्याचा निश्चय, त्यासाठी नव्या युद्धनीतीपासून भाषाशुध्दीपर्यंत त्यांनी घेतलेले क्रांतिकारक निर्णय, त्यांनी दाखविलेला शत्रूमित्रविवेक आणि प्रामाणिकपणे, साधेपणाने जगूनही आपल्याला हवे तसे सुंदर भवितव्य आपण घडवू शकतो हा सर्वसामान्य प्रजाजनांमध्ये त्यांनी निर्माण केलेला दुर्दम्य आत्मविश्वास हे मराठी माणसाचे संचित आहे. त्याचा अभिमान त्यांच्या रक्तात भिनेल तेव्हा आपोआप त्यांचा अनुकूल परिमाण मराठी भाषेच्या प्रतिष्ठितपणावर होईल. इतर भाषिक मराठीच्या विरुद्ध नाहीत. आपण शिवाजीराजांचा अभिमान पातळ केला त्याचा परिणाम मराठीच्या प्रसारणावर झाला. आपण भारतावर राज्य केले आहे. दिल्लीचा शेवटचा वजीर-इ-मुतालिक मराठी होता आणि भारतावर राज्य प्रस्थापित करण्यासाठी शेवटपर्यंत ब्रिटिशांना मराठ्यांशीच लढावे लागले आहे. या तीन गोष्टी नित्य लक्षात ठेवल्या की मराठीत बोलणे मराठी माणसाला कमीपणाचे वाटणार नाही.

आज शाळामहाशाळातून, कार्यालयातून, दूरचित्रवाणीवरून आणि रंगभूमीवरून जे मराठी बोलले जाते ते मराठीचे वांछनीय आणि लोभनीय रूप नाही. घरात नको असलेला नातेवाईक जसा अडगळीत पडतो आणि आपण त्याच्याशी बेदरकारपणे वागतो ती अवस्था मराठीला आली आहे. मराठी शाळा बंद पडत आहेत आणि इंग्रजी शाळा वाढत आहेत. भ्रांत राष्ट्रवाद आणि ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद या दोन गोष्टींनी आपली पुष्कळ हानी केली आहे. मुसलमान दुखावणार नाहीत अशा मापाने आपण आपला राष्ट्रवाद बेतत असतो. त्याचप्रमाणे शुद्धत्वाचा आग्रह धरणे म्हणजे रयतेवर ब्राह्मणशाही लादणे असा आपला ग्रह झालेला असतो. इंग्रजांनी त्यांच्या साम्राज्याच्या स्वार्थासाठी ह्या सामाजिक विभाजन करणार्‍या दोन अनिष्ट गोष्टी आमच्या वैचारिक जडणघडणीत घुसडल्या. तीन टक्के ब्राह्मण 97 टक्क्यांची पिळवणूक करतात असा सिद्धांत राजकारणात प्रचलित होईल अशी योजना ब्रिटिशांनी केली आणि त्याला आम्ही बळी पडलो, पण इंग्रज गेले. आता आम्ही पुनर्विचार करणार की नाही? 

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व हे मुसलमानांच्या आणि एकंदर वंचित घटकांच्या हितविरोधी आहे असा कुप्रचार झाला. त्यातून त्यांच्या भाषाशुद्धीच्या चळवळीची पुष्कळ टिंगल झाली, परंतु आज महापौरांपासून विधिमंडळापर्यंत अनेक शब्द जे आपण दैनंदिन व्यवहारात सहजपणे वापरत आहोत ते सावरकरांनी निर्माण केले आहेत हे आपल्याला माहीत  नसते. आधुनिक मराठी आणि हिंदी भाषांच्या राजकीय परिभाषेवर सावरकरांच्या भाषाशुद्धीचा जाणवावा असा प्रभाव आहे. तरीसुद्धा सावरकरांना शहीद, मालिक आणि कायदा हे तीन शब्द लोप पावायला हवे होते तसे झालेले नाही. त्यादृष्टीने सावरकरांनी केलेला युक्तिवाद अत्यंत समर्पक आहे, पण आपली इच्छाशक्ती तेवढी प्रज्वलित झालेली नाही. या विषयात आंबेडकरांचे उदाहरण पाहण्यासारखे आहे. बाबासाहेबांनी दलितांचे प्रबोधन करण्यासाठी सुरुवातीला जी पाक्षिके काढली तेव्हा आंबेडकरांना मराठी तसे लिहिता येत नसे. ते इंग्रजीत अग्रलेख लिहीत आणि त्यांचे मराठीत भाषांतर होऊन छापायला जाई. आंबेडकरांसारखा स्वाभिमानी माणूस हे फार काळ चालवून घेणे शक्यच नव्हते. त्यांनी बैठक मारून मराठी ग्रंथवाचन करायचे ठरविले. त्यांनी ज्ञानेश्वर-तुकारामांपासून हरिभाऊ आपटे आणि मामा वरेरकरांपर्यंत जे हाताला लागेल ते अधाशासारखे वाचून काढले, पठण केले आणि नंतर ते स्वतः सुंदर नि सुबोध मराठीत लिहू लागले. आजही शुद्ध उच्चारात मराठी माणूस इतरांच्या पुढे आहे. नुकताच नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला तेव्हा ’मै भारतकी प्रभूता और अखंडता अक्षुण्ण रखुंगा’ हे वाक्य केवळ मराठी भाषिक मंत्री  शुद्ध रूपात उच्चारू शकले. पंतप्रधान मोदींचा अपवाद सोडला तर बाकीचे मंत्री ’अक्षुण’ म्हणाले. मराठी माणसाचे संस्कृत उच्चार शुद्ध असतात, असे विवेकानंद म्हणायचे. त्याची प्रचिती आली. थोडक्यात सांगायचे तर मराठी माणसात काही कमी नाही. त्याने ध्रुवतार्‍यासारखे शिवाजीराजे समोर ठेवले तर मराठी शिकायला माणसे धावत पुढे येतील. त्यादृष्टीने एक चांगली योजना मुख्यमंत्री फडणवीसांना पंतप्रधान मोदींसमोर मांडता येईल, पण त्यावर मी पुढे कधीतरी लिहीन. असो.

-अरविंद विठ्ठल कुळकर्णी (मो. क्र. 9619436244)

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply