मुंबई : प्रतिनिधी
राज्य क्रीडा व युवक संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली यांच्या विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय कॅरम स्पर्धेच्या मुले ऐकरीच्या विविध तीन गटांतील (14, 17 व 19 वर्षाखालील मुले) विजेते अनुक्रमे मुंबईचा निलांश चिपळूणकर, अमिन अख्तर अहमद व प्रथम करिहार (नागपूर) यांनी विजेतेपद पटकाविले. ही स्पर्धा सांगली येथील जिल्हा क्रीडा संकुलात महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या सहकार्याने खेळविण्यात आली.
या स्पर्धेला मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, पुणे व यजमान कोल्हापूर विभागातील विविध जिल्ह्यांतून 200 खेळाडू, मुले व पंच यांच्या उत्स्फूर्त सहभाग लाभला.
मुले एकेरीच्या 14 वर्षाखालील गटाच्या अंतीम फेरीच्या तीन गेम रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत मुंबईच्या वनिता विश्राम हायस्कूल खेतवाडीचा विद्यार्थी निलांश चिपळूणकरने मुंबईच्याच मिहीर शेखचा 4-25, 25-4, 25-8 असा पराभव करून विजेतेपदावर पहिल्यांदाच आपले नाव कोरले.
मुले एकेरीच्या 17 वर्षाखालील गटाच्या अंतिम फेरीच्या दाने गेम रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत नागपूरच्या अमीन अख्तर अहमदने मुंबईच्या नीरज कांबळेचा 25-12, 25-7 असा सहज पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरून वर्चस्व सिद्ध केले. मुले एकेरीच्या 19 वर्षाखालील गटाच्या अंतीम फेरीच्या सामन्यात नागपूरच्या प्रथम करिहारने दोन गेम रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत मुंबईच्या जयेश जाधवचा 25-19, 25-20 असा संघर्षपूर्ण विजय मिळवून विजेतेपदाला गवसणी घातली.