Breaking News

सचिन गर्जे हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक

पनवेल ः बातमीदार

नेरूळमधील सचिन गर्जे या तरुणाच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने आणखी एका आरोपीला अटक केली आहे.

तुषार कोळी असे या आरोपीचे नाव असून विकी देशमुख आणि त्याच्या साथीदारांनी सचिन गर्जे याची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी तुषार कोळी याच्या बोटीचा वापर केल्याचे तपासात आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. यापूर्वी पोलिसांनी या हत्येप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आता या हत्या प्रकरणात सहभागी असलेला मुख्य आरोपी विकी देशमुख याच्यासह सहा आरोपींचा शोध सुरू केला आहे.

सराईत गुंड विकी देशमुख आणि त्याच्या साथीदारांनी 14 सप्टेंबर रोजी नेरूळमध्ये रहाणार्‍या सचिन गर्जे याचे सीवूड्स येथील ग्रॅन्ड सेंट्रल मॉलमधून अपहरण करून त्याला उरण परिसरात नेले होते. त्यानंतर त्यांनी सचिनला बेदम मारहाण करून त्याची गोळी मारून हत्या केली होती. त्यानंतर या सर्वांनी तुषार कोळी याच्या बोटीमधून सचिन गर्जे याचा मृतदेह उरणच्या खाडीत टाकून दिला होता. मात्र भरतीमुळे सचिनचा मृतदेह पुन्हा किनार्‍यावर लागल्यानंतर मारेकर्‍यांनी सचिनचा मृतदेह खाडीतील गाळात पुरण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस पडलेल्या पावसामुळे गाळातूनही सचिनचा मृतदेह बाहेर आल्याने या मारेकर्‍यांनी सचिनच्या मृतदेहाची चिरनेर येथील जंगलात जाळून विल्हेवाट लावली होती. नवी मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास करून गेल्या आठवड्यात तीन आरोपींना अटक केली होती. या तिघांच्या चौकशीत हत्या प्रकरणात तुषार कोळी हादेखील असल्याची माहिती पुढे आली. तसेच सचिन गर्जे याचा मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी तुषारच्या बोटीचा वापर करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तुषार कोळी यालादेखील अटक केली.

Check Also

‘नैना’साठी शेतकर्‍यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका

आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तिसर्‍या मुंबईच्या अनुषंगाने नैना …

Leave a Reply