एका दिवसात 22 जणांकडून 3200 रुपयांचा दंड वसूल
पाली : रामप्रहर वृत्त
सुधागड तालुक्यातील पाली शहरात मास्क न लावणार्या नागरिकांवर नगरपंचायत प्रशासक दिलीप रायन्नावार यांच्या आदेशाने बुधवार (दि. 31) दंडात्मक कारवाई करण्यात आली. दिवसभरात 22 व्यक्तींकडून तीन हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे मास्क न लावणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
राज्यात कोरोना बधितांची संख्या पुन्हा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांना मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पाली नगरपंचायती तर्फे ही दंडात्मक कारवाई करण्यात आली.
विना मास्क फिरणार्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पाली नगरपंचायतीने पथक तयार केले आहे. त्यात राजेश कोंजे व प्रविण थळे या कर्मचार्यांचा समावेश आहे. या पथकाने बुधवारी बाजारपेठ व एसटी बस स्थानक परिसरात मास्क न वापरणार्या 22 व्यक्तींना पकडून त्यांच्याकडून दंड वसूल केला. या कारवाईच्या वेळी पोलीस अंमलदार एस. बी. साळवे आणि शेडगे उपस्थित होते.