Breaking News

उद्धवरूपी सह्याद्रीवर देवेंद्रसागराच्या लाटा आदळणार?

मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूं, फिरसे लौटकर आऊंगा! हे उद्गार आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि 14व्या विधानसभेतील नवनियुक्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे. अचानक नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, तसेच त्यांच्या मित्रपक्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात आले. त्यानंतर..

भारतीय जनता पक्षाचे आमदार कालिदास कोळंबकर यांची महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करून त्यांना राजभवनात शपथ दिली. कोळंबकर यांनी भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार वगळता (सुधीरभाऊंच्या घरात लग्नकार्य असल्याने त्यांनी नंतर सदस्यत्वाची शपथ घेतली.) 286 सदस्यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ एका विशेष अधिवेशनात दिली. महाविकास आघाडीचे नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची पद आणि गोपनीयतेची शपथ राज्यपालांकरवी घेतली. त्यांच्याबरोबर शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात व डॉ. नितीन राऊत यांनाही राज्यपालांनी शपथ दिली आणि 3 डिसेंबर 2019पर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी आदेश दिले. यासाठी आघाडी सरकारने विशेष अधिवेशन बोलावण्याची शिफारस राज्यपालांना केली. त्याप्रमाणे विशेष अधिवेशन बोलावताना विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांची उद्धव ठाकरे यांच्या सरकारने विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. संसदीय कार्यप्रणालीचा अनुभव असल्याने वळसे-पाटील यांनी ठाकरे सरकारवरील विश्वासदर्शक प्रस्ताव हाताळला आणि भारतीय जनता पक्ष हा प्रबळ विरोधी पक्ष असल्याने त्यांनी या पक्षाचे विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेले सर्व मुद्दे फेटाळून लावले. ठाकरे सरकारवर विश्वासदर्शक प्रस्ताव काँग्रेसचे अशोक चव्हाण, शिवसेनेचे एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी मांडला. त्यास काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे सुनील प्रभू, राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांनी अनुमोदन दिले.

भाजपच्या सर्वच सदस्यांनी विश्वासदर्शक प्रस्ताव मतदानाच्या वेळी बहिष्कार टाकला. ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमिन अर्थात एआयएमआयएमच्या दोन, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा एक अशा चौघांनी मतदानप्रसंगी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी प्रहार संघटना अशा 169 सदस्यांनी विश्वासदर्शक प्रस्तावाच्या बाजूने मतदान केल्यामुळे ठाकरे सरकारवरील विश्वासदर्शक प्रस्ताव मंजूर झाला.

आता प्रश्न होता तो विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा. हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेतील सर्वच राजकीय पक्ष गटनेत्यांना चहापानासाठी आपल्या दालनात आमंत्रित केले होते. निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. काँग्रेसचे नाना पटोले यांनी बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, सुनील प्रभू, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपने मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांची उमेदवारी जाहीर केली. त्याप्रमाणे कथोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, परंतु वळसे-पाटील यांच्या दालनात सामोपचाराने झालेल्या बैठकीत अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच विरोधी पक्षनेतेसुद्धा याच अधिवेशनात नियुक्त करण्यात येणार असल्याचे ठरले. त्यानुसार कथोरे यांनी पक्षादेशाचा मान ठेवत आपला विधानसभा अध्यक्षपदासाठी भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला. ठरल्याप्रमाणे नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, भाजप विधिमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी नानाभाऊंना अध्यक्षपदाच्या आसनापर्यंत सन्मानाने नेले आणि वळसे-पाटील यांनी त्यांचे पीठासनावर स्वागत करीत या पदावर आसनस्थ केले. ठरल्याप्रमाणे भाजप विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची विधानसभा अध्यक्ष पटोले यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते या पदावर नियुक्ती करण्यात येत असल्याचे घोषित केले. मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांच्यासह सर्वच पक्षाच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करताना 13व्या विधानसभेतील मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या शेवटच्या भाषणाचा आवर्जून उल्लेख केला. मी पुन्हा येईन या वक्तव्याची प्रत्येक नेत्याने आपापल्या परीने अर्थ लावून खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला, पण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस लवकरच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, यासाठी मी कोल्हापूरच्या अंबाबाईला साकडे घालतो, असे सांगितले आणि आम्ही फार

काळ विरोधी पक्षात बसणार नाही, हे ठणकावून सांगितले.

महाविकास आघाडी तयार करण्यात आली तेव्हा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या तीनही पक्षांच्या किमान समान कार्यक्रम बनविण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. शिवसेनेचे हिंदुत्व या कार्यक्रमात राहणार नाही, अशीच चर्चा सुरू झाली, परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीनंतर करण्यात आलेल्या अभिनंदनपर भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि हिंदुत्व हे वेगळे होऊच शकत नाही, असे स्पष्ट करताना फडणवीस हे आपले मित्र होते, आहेत आणि कायमच राहतील. मी त्यांना विरोधी पक्षनेता मानायला तयार नाही, असेही सांगितले. फडणवीस यांनी आपल्या उत्तरादाखल केलेल्या भाषणात प्रत्येक वक्त्याच्या वक्तव्याचा पुरेपूर समाचार घेतलाच, परंतु मुख्यमंत्री उद्धवराव, आपण कधीही हाक मारलीत तरी आपल्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी धावत येईन, असे निःसंदिग्ध आश्वासन दिले. फडणवीस यांच्या आवाजाची धार जराही कमी झाली नव्हती. प्रत्येक नेत्याच्या भाषणातील कोपरखळीला सणसणीत चपराक लगावण्यात जराही कसूर न करता आपल्या आगामी भूमिकेची दिशा स्पष्ट करताना होय, मी पुन्हा येईन हे बोललो होतो, परंतु टाइमटेबल सांगितले नव्हते, अशी गुगली टाकली आणि मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूं, फिरसे लौटकर आऊंगा, अशी टाळ्यांच्या कडकडाटात बाजी मारली. छगन भुजबळ यांच्याकडे पाहत फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या रचनेवर आपल्या शेलक्या शब्दांत सांगितले की, जर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रित येऊन सरकार बनू शकते तर काहीही अशक्य नाही व भुजबळसाहेब, तुम्हाला घेऊन मी पुन्हा येईन, असा टोला मारला.

2014पासून देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे हे एकत्रितपणे महायुतीचे नेतृत्व करीत होते. आताही डॉ. मनोहर जोशी यांच्यापासून तर डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्यापर्यंत अनेकांनी भारतीय जनता पक्ष व शिवसेना पुन्हा एकत्र येतील, अशी अपेक्षा-आशा बोलून दाखवली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा यांनीसुद्धा महायुतीचे दरवाजे बंद करण्यात आले नाहीत, असे सूतोवाच केले आहे. उद्याच्या उदरात काय दडले आहे कुणास ठावूक, पण यशवंतराव चव्हाण जेव्हा पं. जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून गेले तेव्हा महाराष्ट्र कवी गजानन दिगंबर म्हणजेच ग. दि. माडगूळकर यांनी चव्हाण यांच्या अभिनंदनपर ठरावावर बोलताना महाराष्ट्र विधान परिषदेत हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला, ही उपमा दिली होती. याचाच अर्थ महाराष्ट्र म्हणजे सह्याद्री व मुख्यमंत्री उद्धव (ठाकरे) रूपी सह्याद्रीवर विधानसभेच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात स्वतःला

समंदर असे संबोधणार्‍या विरोधी पक्षनेते देवेंद्र (फडणवीस) सागराच्या लाटा आदळतात काय, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कदाचित देवेंद्र आणि उद्धव हे दोन्ही काँग्रेसला खेळवतात. मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर, असे चित्र रंगवितात की खरोखरच सत्ताधारी आणि विरोधी पक्ष म्हणून एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे राहतात हे पाहावे लागेल. अर्थात आता घोडा मैदान दूर नाही!

-योगेश त्रिवेदी (9892935321)

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply