Breaking News

ठेवीदारांचे पैसे द्या, जाहीर सत्कार करू!

आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांचे कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी खुले आव्हान

पनवेल : रामप्रहर वृत्त

विवेक पाटील यांनी कर्नाळा बँकेच्या समोर उभे राहून ठेवीदारांना एक महिन्याच्या मुदतीत पैसे देण्याचे आश्वासन देऊन त्या मुदतीत पैसे द्यावे. त्यांचा आम्ही जाहीर सत्कार करू, असे खुले आव्हान आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी ठेवीदारांच्या संमतीने व साक्षीने शनिवारी (दि. 14) येथे दिले.

कर्नाळा नागरी सहकारी बँकेने घोटाळा केल्याचे उघडकीस झाल्याने खातेदार, ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण वाढतच आहे. या घोटाळ्यामुळे अनेक ठेवीदार व खातेदारांना पैसे मिळत नाहीयेत. त्या संदर्भात ठेवीदार व खातेदारांना मार्गदर्शन करण्यासाठी पनवेल मार्केट यार्ड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मार्गदर्शन करताना जोपर्यंत ठेवीदारांना त्यांचे पसे परत मिळत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे आश्वस्त करताच या भूमिकेचे ठेवीदारांनी टाळ्यांच्या कडकडाट स्वागत केले. या वेळी ठेवीदारांनी कर्नाळा बँकेकडून स्वतःच्या हक्काचे पैसे मिळत नसल्याने संघटित होण्याचा निर्धार करतानाच या बँकच्या बोगस कारभाराचे धिंडवडे काढले. बँक घोटाळ्यामुळे आतापर्यंत 18 खातेदारांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची धक्कादायक माहिती खारघरच्या एका ठेवीदाराने दिली.

दोन्ही आमदारांनी बोलताना, पैसे मिळवून देण्यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न आहेत. तुमची साथ संघटितपणे आम्हाला हवी आहे, तरच हा प्रश्न सुटेल. तुमच्यासाठी आम्ही लढतोय, पण या लढाईला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत आहे. यात आमचा कोणताही राजकीय हेतू नाही. फक्त ठेवीदारांचे पैसे त्यांना परत मिळावे हाच शुद्ध हेतू आहे, असे नमूद केले.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, निवडणूकीत राजकीय स्वार्थासाठी स्टंट करतायेत असा अप्रचार होईल आणि मुदतीत पैसे मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती, मात्र त्यानंतरही आजच्या परिस्थितीत ठेवीदारांना पैसे मिळणे कठीण झाले आहे. ठेवीदारांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या आहेत आणि लोकप्रतिनिधी म्हणून ठेवीदारांना न्याय देण्याची आग्रही भूमिका आम्ही घेतली आहे. या संदर्भात अर्थतज्ज्ञ, माजी खासदार किरीट सोमय्या यांचे मार्गदर्शन घेतले. त्यानुसार त्यांच्यासोबतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय), सहकार आयुक्त व संबंधित प्रशासनाकडे यासंदर्भात पाठपुरावा केला. त्याला यश येऊन कर्नाळा नागरी सहकारी बँकेचा घोटाळा उघडकीस आला आहे. या बँकेत 59 बोगस खाती उघडून शेकडो कोटी रुपयांचे कर्ज संचालक मंडळाने लंपास केल्याचे निदर्शनास आल्याने आरबीआयने विशेष लेखापरीक्षण करून सहकार आयुक्तांना अहवाल दिला होता. सहकार आयुक्तांनी या अहवालाची तपासणी करून हा घोटाळा झाल्याचे स्पष्ट केले आहे. या घोटाळ्यामुळे ठेवीदारांवर संकट आले आहे. ते दूर करण्यासाठी आपण कायम एकजुटीने प्रयत्नशील राहू या, असे आवाहनही त्यांनी केले. 

ठेवीदारांना त्यांचे पैसे देण्यासाठी बँकेने 15 दिवसांत आराखडा तयार करून एक महिन्याच्या मुदतीत पूर्ण पैसे द्यावेत. पैसे परत मिळवून देण्याकरिता व त्यासंदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी ठेवीदार संघर्ष समिती निर्माण करण्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी जाहीर करून आमदार महेश बालदी यांनी या लढ्यासाठी पहिले पाऊल उचलले आहे. त्यामुळे या संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणून ते नेतृत्व करणार असून, समितीमध्ये माझ्यासह सहकार क्षेत्राची माहिती असलेल्या 10 ठेवीदारांचा समावेश असणार आहे. संघर्षाच्या अनुषंगाने बँकेकडून या काळात अनेक खोटे कारनामे केली जातील. संघर्ष समिती केली आणि प्रशासक नेमला. आता पैसे कसे देणार असे अजबगजब उत्तर बँकेकडून येईल. पैसे देणार होतो, पण हे राज्यपालांना भेटले. आता कसे पैसे देऊ, असा खोटा आव आणतील, पण दिशाभूल करणार्‍या अशा उत्तरांना आपण जुमानायचे नाही. आपला लढा सर्वसामान्यांचा आहे. त्यामुळे बँकेच्या भूलथापांना न बळी पडता ही लढाई जिंकायची आहे. त्यासाठी लागेल तेवढा संघर्ष आपण संघटितपणे करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. 

आमदार महेश बालदी यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की, ठेवीदारांचे पैसे बुडवून विवेक पाटील यांनी विधानसभा लढवली. निवडणुकीचे निमित्त पुढे करून ठेवीदारांना आश्वासने दिली आणि ती हवेत विरली. 10-10 वेळा खोटी आश्वासने देण्यापेक्षा व लोकांच्या पैशावर मॉल बांधण्यापेक्षा स्वतःची प्रॉपर्टी विकून ठेवीदारांचे पैसे द्या असा सल्ला देताच सभागृह टाळ्यांच्या कडकडाने दणाणून गेले. बँकेच्या घोटाळ्यामुळे विवेक पाटील यांची अटक अटळ आहे. म्हणूनच स्वतःची अटक टाळण्यासाठी ते दारोदारी फिरत असल्याचे दिसत आहे. खरोखर दानत असती तर विवेक पाटलांनी ठेवीदारांचे पैसे कधीच दिले असते. आता नुसती आश्वासने का देता? हिंमत असेल तर ठेवीदारांना विवेक पाटलांनी स्वतःचे एक महिन्याच्या मुदतीचे पीडीसी चेक द्यावे, असे आव्हानही आमदार बालदी यांनी दिले.

या बैठकीस भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, एकनाथ भोपी, तालुका सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक अजय कांडपिळे, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, प्रल्हाद केणी, उपाध्यक्ष के. ए. म्हात्रे, सुभाष पाटील, कुंडलिक काटकर, मंगेश वाकडीकर यांच्यासह ठेवीदार शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply