देवेंद्र फडणवीसांचा सवाल
मुंबई ः प्रतिनिधी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली आहे. सिंह यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे सांगत त्या वेळी देशमुख क्वारंटाइनमध्ये होते, असे पवारांनी सांगितले. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 15 फेब्रुवारी रोजी झालेल्या देशमुख यांच्या पत्रकार परिषदेचे ट्विट रिट्विट करीत सवाल पवारांना सवाल केला आहे.
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून बदली करण्यात आल्यानंतर पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून गंभीर आरोप केले. त्या पत्रावरून रणकंदन सुरू असून, अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत आहे, मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली आहे. परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाला ठोस आधार नसल्याचे सांगत पवारांनी देशमुखांची पाठराखण केली. सिंह यांनी दिलेल्या तारखांच्या कालावधीत देशमुख हे क्वारंटाइन होते, असे ते म्हणाले.
पवार यांच्या या विधानानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करीत शरद पवारांना उलट सवाल केला आहे. 15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाइन होते, असे पवार साहेब सांगतात, पण 15 फेब्रुवारीला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
परमवीर सिंह यांच्या पत्रावर शरद पवार यांना पुरेशी माहिती देण्यात आलेली नाही, असे स्पष्टपणे दिसून येते. या पत्रात नमूद केलेला एसएमएसचा पुरावाच सांगतो की, ही भेट फेब्रुवारीच्या अखेरीस झालेली आहे. आता नेमके कोण दिशाभूल करते आहे?, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.