Breaking News

खेळा, फिट राहा, यशस्वी व्हा!

खेळांचा हंगाम आता भरात येऊ लागला आहे. जिकडे-तिकडे वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा रंगताना दिसत असून, त्यामध्ये असंख्य खेळाडू सहभाग घेत आपले कौशल्य दाखवत आहेत. खेळ म्हणजे केवळ मनोरंजन व शारीरिक कसरत ही

संज्ञा काळाच्या ओघात बदलली. या क्षेत्रातही करिअर होत असल्याने मुलांसह त्यांच्या पालकांचा ओढा विविध खेळांकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हा बदल सुखदच म्हटला पाहिजे.

मानवी जीवनात खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येकाने बालपणी किमान एकतरी खेळ खेळलेला असतो. त्या नुसत्या आठवणीने मोहरल्यासारखे होते. खेळांची हीच तर खासियत आहे. पूर्वीच्या काळी लगोरी, आट्यापाट्या, कवड्या, सूर पारंब्या, विटी-दांडू असे एक ना अनेक खेळ होते. सुट्यांच्या दिवसांमध्ये बच्चेकंपनी या खेळांमध्ये हरखून जात असे. शाळेत गेल्यावर कबड्डी, खो-खो यांसारखे खेळ जोडले जात असत, पण या खेळांकडे पूर्वी फक्त करमणूक म्हणून पाहिले जायचे. त्यामुळे पालक हे मुलांना खेळण्यास मज्जाव करीत असत. खेळण्यापेक्षा अभ्यास कर, असा सूर पालकवर्गातून सर्रास लावला जाई, परंतु आधुनिक काळात खेळांचे महत्त्व कमालीचे वाढले आहे. याचे कारण वर उल्लेख केल्याप्रमाणे हल्ली क्रीडा क्षेत्रात चांगले करिअर होत असल्याने खेळाकडे पाहण्याचा सर्वांचा दृष्टिकोन बदलला. जे पालक पूर्वी खेळाप्रति नाक मुरडायचे तेच आज मुलांना मैदानात घेऊन जात असल्याचे चित्र पाहावयास मिळते. आणखी एक आनंददायी बाब म्हणजे अलीकडे शहरांबरोबरच गावखेड्यातील मुलेही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये आपली चमक दाखवत आहेत.

वास्तविक भारतीयांकडे गुणवत्तेची कमी कधीच नव्हती. नाहीतर हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद, कुस्तीपटू खाशाबा जाधव, क्रिकेटर कपिल देव यांच्यासारख्या खेळाडूंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत यशाची पताका साता समुद्रापार रोवली नसती. राष्ट्रीय खेळ हॉकी असो की देशी मातीतली कुस्ती, कबड्डी; शारीरिक कस लागणार्‍या मैदानी खेळांमध्ये आपल्या देशाचा दबदबा होता, परंतु क्रिकेट वगळता जागतिक स्तरावर खेळल्या जाणार्‍या अन्य क्रीडाप्रकारांत आपण फारच मागे होतो. एकतर या खेळांचा प्रचार-प्रसार आपल्याकडे म्हणावा तितका झाला नव्हता आणि दुसरे व प्रमुख कारण म्हणजे खेळाडूंना आवश्यक सोयीसुविधांची प्रचंड वानवा होती. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषत: प्रतिष्ठेच्या ऑलिम्पिकमध्ये आकार व लोकसंख्येने आपल्यापेक्षा छोटे असलेले देश पदकतालिकेत मात्र आपल्या वरच्या स्थानी असत. आजही काही देशांनी ही परंपरा कायम राखली आहे, पण आपल्या देशानेही पदकांचा दुष्काळ एव्हाना संपुष्टात आणला आहे. पूर्वी अभावाने मिळणारे पदक आता हमखास मिळते.

आपल्या भारतात क्रिकेटबरोबरच अन्य खेळ व खेळाडूंनीही आपली जागा बनविली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (क्रिकेट), विश्वनाथ आनंद (बुद्धिबळ), लिएंडर पेस (टेनिस), पुलेला गोपीचंद (बॅडमिंटन) यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून अनेक प्रतिभावंत खेळाडूंनी स्वत:सह शाळा, गाव-शहर, राज्यासह देशाचे नाव क्रीडा क्षेत्रात रोशन केले. नेमबाज अभिनव बिंद्रा, कुस्तीपटू सुशील कुमार या नव्या पिढीतील शिलेदारांनी देशाचे ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न पूर्ण केले. विशेष म्हणजे याही क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने मुली-महिला अग्रेसर आहेत. ‘सुवर्णकन्या’ पी. टी. उषा, ‘सुपर मॉम’ मेरी कोम यांच्या पावलावर पाऊल टाकून अनेकींनी यशोशिखर गाठले, तर काही उदयोन्मुख महिला खेळाडू प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर देशी-विदेशी स्पर्धा गाजवत आहेत. यामध्ये सानिया मिर्झा (टेनिस), फुलराणी सायना नेहवाल व पी. व्ही. सिंधू (बॅडमिंटन), फोगट भगिनी (कुस्ती) यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल.

एकूणच आपल्या संपूर्ण देशात क्रीडा चळवळ फोफावत आहे. शासनाबरोबरच शाळा-महाविद्यालये, खासगी कंपन्या, प्रायोजक खेळाडूंना प्रोत्साहन आणि पाठबळ देत आहेत. त्यामुळे जगभरातील जवळपास सर्व खेळांमध्ये भारत प्रतिनिधित्व करीत आहे. नाही म्हणायला फुटबॉलसारख्या काही खेळांमध्ये आपण कच्चे लिंबू आहोत. शिवाय मानाच्या ऑलिम्पिक

स्पर्धेत आपल्याला बराच टप्पा गाठायचा आहे. देशातील खेळाडूंची प्रगती पाहता आगामी काळात ही कसर भरून निघेल, अशी आशा करायला हरकत नाही. त्यासाठी आवश्यकता आहे अपार मेहनत व काटेकोर नियोजनाची. यशाला कुठेही शॉर्टकट नसतो. खेळात तर तो मुळीच नसतो. त्यामुळे यश मिळण्यासाठी कळत-नकळत चुकीचे पाऊल उचलून नंतर पश्चाताप करण्यापेक्षा संबंधित तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, प्रशिक्षण घेऊन मार्गक्रमण करणे केव्हाही उत्तम.

मंडळी, खेळ हे व्यथा व चिंता विसरावयास लावून शरीर व मन ताजेतवाने करण्याचे काम करतात. त्यामुळे मुलांना मोबाइल, टीव्हीऐवजी विविध मैदानी खेळांची गोडी लावल्यास ती सुदृढ व निरोगी राहतील. त्याचप्रमाणे चिडचिड न करता आनंदीही बनतील. आणि हो मुलेच कशाला मोठी मंडळीही खेळू शकतात. दैनंदिन जीवनात निदान चालू-पळू शकतात. मग फिटनेस आपोआप राखला जाईल आणि याच तंदुरुस्तीच्या जोरावर काम करून यशस्वीदेखील होता येईल. तेव्हा वाट कसली बघता. उठा.. घराबाहेर पडा.. आणि मैदान गाठा..!

-समाधान पाटील (मो. क्र. 9004175065)

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply